राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांनी आज (13 नोव्हेंबर 2024) दादरा आणि नगर हवेली आणि दमण आणि दीव मधील सिल्वासा येथे स्वामी विवेकानंद विद्या मंदिर, झंडा चौक चे उद्घाटन केले आणि एका सार्वजनिक कार्यक्रमाला संबोधित केले.
यावेळी बोलताना राष्ट्रपती म्हणाल्या की, दादरा आणि नगर हवेली आणि दमण आणि दीवच्या जनतेने त्यांचे ज्या आपुलकीने स्वागत केले ते कायम त्यांच्या स्मरणात राहील. त्यांनी या स्वागताबद्दल केंद्रशासित प्रदेशातील लोकांचे आभार मानले.
झंडा चौक शाळेचे उद्घाटन करताना आनंद झाल्याचे राष्ट्रपती म्हणाल्या. केंद्रशासित प्रदेश प्रशासनाने उच्च शिक्षणाला चालना देण्यासाठी मोठ्या प्रमाणावर प्रयत्न केले आहेत. विद्यार्थ्यांना दर्जेदार तांत्रिक शिक्षण देण्यासाठी 2018 मध्ये शासकीय अभियांत्रिकी महाविद्यालय सुरू करण्यात आले आणि 2022 मध्ये एनआयएफटी ची स्थापना करण्यात आली. या प्रयत्नांमुळे केंद्रशासित प्रदेशातील युवकांना मोठी संधी मिळेल असा विश्वास त्यांनी व्यक्त केला.
राष्ट्रपती म्हणाल्या की, या प्रदेशाला समृद्ध ऐतिहासिक, सांस्कृतिक आणि नैसर्गिक वारसा आहे. त्यामुळे दादरा, नगर हवेली, दमण आणि दीव ही उत्तम पर्यटन स्थळे आहेत. पर्यटन सुविधा विकसित करण्यासाठी सरकारने केलेल्या उपाययोजनांबद्दल त्यांनी आनंद व्यक्त केला. त्या म्हणाल्या की, पर्यटनाच्या विस्तारामुळे रोजगाराच्या नवीन संधी निर्माण होतात. वेगवेगळ्या प्रांतातील लोकांशी भेट आपल्याला अधिक उदार आणि संवेदनशील बनवते.