केंद्रीय प्रत्यक्ष कर मंडळाने प्राप्तिकर विवरणपत्रात करदात्यांना परदेशी मालमत्तेची माहिती (शेड्यूल फॉरेन ॲसेट्स ) अचूकपणे भरण्यात आणि परकीय स्रोतांकडून (अनुसूची एफएसआय) मिळालेल्या उत्पन्नाची माहिती भरण्यात मदत म्हणून मूल्यांकन वर्ष 2024-25 साठी अनुपालन आणि जागरूकता मोहीम सुरू केली आहे. काळा पैसा (अघोषित परकीय उत्पन्न आणि मालमत्ता) आणि कर आकारणी कायदा, 2015 अंतर्गत शेड्यूल एफए आणि एफएसआय’चे पालन करणे अनिवार्य आहे, ज्यासाठी परदेशी मालमत्ता आणि उत्पन्नाचे संपूर्ण प्रकटीकरण आवश्यक आहे.
या मोहिमेचा एक भाग म्हणून मूल्यांकन वर्ष 2024-25 साठी आधीच प्राप्तिकर विवरणपत्र (आयटीआर) दाखल केलेल्या निवासी करदात्यांना एसएमएस आणि ईमेलद्वारे माहितीपर संदेश पाठवले जातील. हे संदेश द्विपक्षीय आणि बहुपक्षीय करारांतर्गत तपशील-प्राप्त व्यक्तींसाठी आहेत, ज्यांच्याकडे परदेशी खाती किंवा मालमत्ता असू शकते किंवा परदेशी स्रोतातून उत्पन्न मिळाले आहे. ज्यांनी मूल्यांकन वर्ष 2024-25 साठी दाखल केलेल्या आयटीआर मध्ये परदेशी मालमत्तेचा, विशेषत: उच्च-मूल्याच्या परदेशी मालमत्तेचा समावेश असलेल्या प्रकरणांमध्ये तपशील पूर्णपणे भरला नसेल, त्यांना आठवण करून देणे आणि मार्गदर्शन करणे हा यामागचा उद्देश आहे.
हा उपक्रम विकसित भारतच्या दृष्टिकोनाला अनुरूप आहे, जो करदात्यांचे अनुपालन सुलभ करण्यासाठी आणि मानवी हस्तक्षेप कमी करण्यासाठी तंत्रज्ञानाचा वापर करण्याप्रति प्राप्तिकर विभागाची वचनबद्धता अधोरेखित करतो. स्वयंचलित माहिती आदानप्रदान (AEOI) द्वारे प्राप्त डेटा मिळवून प्राप्तिकर विभाग अधिक कार्यक्षम, करदाता-स्नेही प्रणाली तयार करण्यासाठी काम करत आहे.
सर्व पात्र करदाते त्यांच्या कर विषयक जबाबदाऱ्या पूर्ण करण्यासाठी आणि देशाच्या आर्थिक विकासात योगदान देण्यासाठी या संधीचा लाभ घेतील, अशी अपेक्षा सीबीडीटीने व्यक्त केली आहे. हा प्रयत्न सरकारच्या विकसित भारताच्या संकल्पनेला अनुरूप आहे, त्याचबरोबर पारदर्शकता, दायित्व आणि स्वैच्छिक अनुपालन संस्कृतीला देखील प्रोत्साहन देतो.
शेड्यूल फॉरेन ॲसेट्स पूर्ण भरण्याच्या तपशीलवार मार्गदर्शनासाठी करदात्यांना प्राप्तीकर विभागाचे अधिकृत संकेतस्थळ www.incometax.gov.in ला भेट देण्यास प्रोत्साहित केले जाते, जिथे त्यांना मदत करण्यासाठी स्रोत आणि सहाय्य सहज उपलब्ध आहे.