ब्राझीलमध्ये रिओ द जानिरो येथे आयोजित जी20 परिषदेदरम्यान पंतप्रधान मोदी यांनी आज इटलीच्या पंतप्रधान जॉर्जिया मेलोनी यांची भेट घेतली. या दोन पंतप्रधानांची गेल्या दोन वर्षांतील ही पाचवी भेट आहे. आजच्या भेटीआधी जून 2024 मध्ये इटलीत पुगलिया येथे पंतप्रधान मेलोनी यांच्या अध्यक्षतेखाली आयोजित जी 7 शिखर परिषदेनिमित्त या दोन नेत्यांची भेट झाली होती. सध्याच्या आव्हानात्मक परिस्थितीत जी 7 चे नेतृत्व करत असल्याबद्दल पंतप्रधान मोदी यांनी पंतप्रधान मेलोनी यांचे अभिनंदन केले.
पुगलिया येथे झालेल्या चर्चेचा संदर्भ घेत, भारत-इटली धोरणात्मक भागीदारी आणखी पुढे नेण्याप्रती असलेल्या कटिबद्धतेचा पुनरुच्चार करुन दोन्ही नेत्यांनी येत्या पाच वर्षांसाठीच्या त्यांच्या संकल्पनांची रूपरेषा स्पष्ट करणाऱ्या संयुक्त धोरणात्मक कृती योजना 2025-29 ची घोषणा केली. या कृती योजनेद्वारे व्यापार आणि गुंतवणूक, विज्ञान आणि तंत्रज्ञान,नूतन आणि उदयोन्मुख तंत्रज्ञाने, स्वच्छ उर्जा, अवकाश, संरक्षण, दूरसंचार तसेच जनतेतील परस्पर संबंध यांसह महत्त्वाच्या इतर क्षेत्रांतील संयुक्त सहकार्य प्रकल्प, कार्यक्रम आणि उपक्रमांची अंमलबजावणी केली जाईल.
दोन्ही देश विविध विषयांच्या संदर्भात नियमित मंत्रीस्तरीय आणि अधिकृत चर्चांचे आयोजन करतील. सह-उत्पादन, परस्परांशी संबंधित उद्योग आणि संस्थांच्या दरम्यान सहयोग, नवोन्मेष आणि गतिशीलता यांच्यामुळे द्विपक्षीय भागीदारीला वेग आणि अधिक सघनता येईल आणि त्यायोगे दोन्ही देशांच्या अर्थव्यवस्थांचा फायदा होईल.
दोन्ही देशांनी परस्पर संवाद पुढे सुरु ठेवण्याबाबत तसेच त्यांची लोकशाहीविषयक सामायिक तत्वे, कायद्याचे राज्य आणि शाश्वत विकास यांचे समर्थन करण्यासाठी बहुपक्षीय तसेच जागतिक मंचांवर एकत्र येऊन काम करण्याबाबत उत्सुकता व्यक्त केली. भारत आणि इटली हे दोन्ही देश जागतिक जैवइंधन आघाडी तसेच भारत-मध्य-पूर्व- युरोप आर्थिक मार्गिका या उपक्रमांचे संस्थापकीय सदस्य आहेत. तर या उपक्रमांसह बहुपक्षीय धोरणात्मक उपक्रमांच्या अंमलबजावणीसाठी एकत्रितपणे काम करणे यापुढे सुरु ठेवण्याबाबत दोन्ही नेत्यांनी सहमती दर्शवली.