पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आज गयानाच्या राष्ट्रीय संसदेला संबोधित केले. गयानाच्या राष्ट्रीय संसदेला संबोधित करणारे ते पहिले भारतीय पंतप्रधान आहेत. गयाना संसदेचे अध्यक्ष मन्झूर नादिर यांनी पंतप्रधान मोदी यांच्या भाषणासाठी विशेष अधिवेशन बोलावले होते.
आपल्या भाषणात पंतप्रधानांनी भारत आणि गयाना यांच्यातील दीर्घकालीन ऐतिहासिक संबंधांचे स्मरण केले. त्यांना देण्यात आलेल्या गयानाच्या सर्वोच्च सन्मानाबद्दल त्यांनी गयानाच्या जनतेचे आभार मानले. भारत आणि गयाना यांच्यामध्ये भौगोलिक अंतर असूनही, सामायिक वारसा आणि लोकशाहीने उभय राष्ट्रांना एकमेकांच्या जवळ आणल्याचे त्यांनी नमूद केले. दोन्ही देशांची सामायिक लोकशाही मूल्ये आणि समान मानव-केंद्रित दृष्टिकोन अधोरेखित करताना त्यांनी नमूद केले की, या मूल्यांमुळे त्यांना सर्वसमावेशक मार्गावर प्रगती करण्यास मदत झाली.
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी नमूद केले की, भारताचा ‘मानवता सर्वप्रथम’ हा मंत्र ब्राझीलमध्ये नुकत्याच झालेल्या जी-20 शिखर परिषदेसह ग्लोबल साऊथचा आवाज सर्वदूर पोहचवण्यास प्रेरणादायी ठरतो. त्यांनी पुढे नमूद केले की, भारताला विश्वबंधू, जगाचा मित्र या नात्याने मानवतेची सेवा करायची आहे आणि या मूलभूत विचाराने जागतिक समुदायाकडे पाहण्याचा आपला दृष्टीकोन आहे. मग एखादे राष्ट्र लहान असो अथवा मोठे; आपण सर्व राष्ट्रांना समान महत्त्व देतो.
अधिकाधिक जागतिक प्रगती आणि समृद्धी घडून येण्यासाठी महिलांच्या नेतृत्वाखालील विकासाला प्राधान्य देण्याचे आवाहन पंतप्रधानांनी केले. त्यांनी दोन्ही देशांदरम्यान शिक्षण आणि नवनवीन संकल्पनांच्या क्षेत्रात अधिकाधिक देवाणघेवाण करण्याचे आवाहन केले; जेणेकरुन तरुणांच्या क्षमतांचा पूर्ण उपयोग होईल. कॅरिबियन क्षेत्राला भारताचा दृढ पाठिंबा असल्याचे सांगून, त्यांनी दुस-या इंडिया-कॅरिकॉम शिखर परिषदेचे आयोजन केल्याबद्दल अध्यक्ष अली यांचे आभार मानले. भारत-गयाना ऐतिहासिक संबंध अधिक दृढ करण्याप्रति भारताची दृढ वचनबद्धता अधोरेखित करताना त्यांनी सांगितले की,गयाना, हा भारत आणि लॅटिन अमेरिका खंडातील संधींचा सेतू बनू शकतो. “आपल्याला भूतकाळातून शिकायचे आहे आणि आपला वर्तमान सुधारायचा आहे आणि भविष्यासाठी मजबूत पाया तयार करायचा आहे.”असेही पंतप्रधान नरेंद्र मोदी यावेळी म्हणाले.त्यांनी गयानाच्या संसद सदस्यांना भारत भेटीचे निमंत्रण दिले.