सरकारचा ग्राहक व्यवहार विभाग आणि शिक्षण मंत्रालयाच्या नवोन्मेषी आघाडीच्या सहकार्याने टोमॅटो मूल्य साखळीच्या विविध स्तरांवर नाविन्यपूर्ण कल्पना आमंत्रित करण्यात आल्या. यासाठी ‘टोमॅटो ग्रँड चॅलेंज (टीजीसी) नावाच्या हॅकाथॉनची सुरुवात केली होती. दि. 30.06.2023 रोजी सुरू करण्यात आलेल्या टोमॅटो ग्रँड चॅलेंजला (टीजीसी) विद्यार्थी, संशोधनकर्ते, प्राध्यापक सदस्य, उद्योग जगत , स्टार्ट-अप आणि व्यावसायिक यांच्याकडून उत्साही प्रतिसाद मिळाला.
संपूर्ण भारतातील नवकल्पकांकडून एकूण 1,376 कल्पना प्राप्त झाल्या. मूल्यांकनाच्या कठोर फेऱ्यांनंतर, 28 कल्पनांना ‘प्रोटोटाइप डेव्हलपमेंट’ आणि मेंटॉरशिपसाठी निधी प्रदान करण्यात आला आहे, अशी माहिती ग्राहक व्यवहार विभागाच्या सचिव निधी खरे यांनी आज पत्रकारांशी संवाद साधताना दिली.
जागतिक स्तरावर टोमॅटोचा दुसरा सर्वात मोठा उत्पादक असलेला भारत दरवर्षी 20 दशलक्ष मेट्रिक टन उत्पादन करतो. तथापि, प्रतिकूल हवामान परिस्थिती असताना, म्हणजे अति पाऊस किंवा अचानक अतिकडक उन पडणे यांचा परिणाम उत्पादनावर आणि उपलब्धतेवर होतो.त्यामुळे टोमॅटोच्या किमतीमध्ये कमालीचा चढ-उतार होतो. ही आव्हाने थेट शेतकऱ्यांच्या उत्पन्नावर परिणाम करतात. तसेच बाजारपेठेतील टोमॅटोची पुरवठा साखळीही विस्कळीत करतात. भाव एकदम कमी झाल्यानंतर अनेकवेळा मोठ्या प्रमाणात टोमॅटो वाया जातात.एकणूच या गंभीर समस्यांचे निराकरण करण्यासाठी टोमॅटो ग्रँड चॅलेंज (टीजीसी) आणि टोमॅटो पुरवठा साखळी स्थिर करण्यासाठी नाविन्यपूर्ण आणि व्यापक उपाय शोधण्यासाठी सुरू करण्यात आले आहे.
टोमॅटो उत्पादन, प्रक्रिया आणि वितरण यातील प्रणालीगत आव्हानांना तोंड देण्यासाठी भारतातील तरुण नवोदित आणि संशोधकांच्या प्रतिभेचा उपयोग करणे हे ग्रँड चॅलेंजचे उद्दिष्ट आहे. पुढील आव्हाने आहेत:
- पूर्व-उत्पादन: हवामानास अनुकूल बियाण्याचा अल्प वापर आणि खराब कृषी पद्धतींचा वापर
- काढणीनंतरचे नुकसान: शीत गोदाम सुविधांचा अभाव आणि अयोग्य हाताळणी यामुळे नुकसान होते.
- प्रक्रिया आणि मूल्यवर्धन: अतिरिक्त टोमॅटोवर प्रक्रिया करण्यासाठी अपुरी पायाभूत सुविधा.
- पुरवठा साखळी: खंडित पुरवठा साखळी आणि मध्यस्थांच्या वर्चस्वामुळे अकार्यक्षमता आणि किंमतीतील अस्थिरता.
- बाजार प्रवेश आणि मागणी अंदाज: बाजारपेठेत माल आणण्यात सातत्याचा अभाव आणि मागणीचा अंदाज घेण्यासाठी साधनांचा अभाव असल्यामुळे किंमती पडतात आणि अपव्यय होतो.
- तंत्रज्ञानाचा अवलंब: ‘आयओटी’आधारित म्हणजेच इंटरनेट ऑफ थिंग्स आधारे देखरेख यांसारख्या आधुनिक कृषी तंत्रज्ञानाविषयी मर्यादित जागरूकता
- पॅकेजिंग आणि वाहतूक: टॉमेटो पिकाचे ‘शेल्फ लाइफ’ अर्थात टिकाऊपणा सुधारण्यासाठी आणि तोटा कमी करण्यासाठी नाविन्यपूर्ण, किफायतशीर उपायांची गरज.
संपूर्ण भारतातील नवकल्पकांकडून एकूण 1,376 नवोन्मेषी कल्पना प्राप्त झाल्या. कठोर मूल्यमापनानंतर पहिल्या फेरीत 423 कल्पना निवडल्या गेल्या. 29 कल्पना दुसऱ्या फेरीपर्यंत पोहोचल्या. त्यातील 28 प्रकल्पांना निधी आणि मार्गदर्शन मिळाले.
‘टोमॅटो ग्रँड चॅलेंज’ ने महत्त्वपूर्ण प्रभाव निर्माण केला आहे, ज्यामुळे 14 पेटंट – बौदि्धक स्वामित्व, 4 डिझाइन नोंदणी/ट्रेडमार्क आणि 10 प्रकाशनांसह अनेक -आयपी फाइलिंग’ प्रक्रियेत आहेत.
टोमॅटो ग्रँड चॅलेंज हे सहकार्य आणि नाविन्यपूर्णतेला मिळणाऱ्या ताकदीचा पुरावा आहे. अकादमी, उद्योग आणि सरकार यांना एकत्र आणून, भारताच्या कृषी आव्हानांवर शाश्वत, प्रभावी उपायांचा मार्ग मोकळा केला आहे. या उपक्रमाच्या परिणामांचा फायदा शेतकरी आणि टोमॅटोचे ग्राहक दोघांनाही होणार आहे.