केंद्रीय युवा व्यवहार आणि क्रीडा तसेच श्रम आणि रोजगार मंत्री डॉ. मनसुख मांडवीय यांनी विकसित भारताचे स्वप्न साकार करण्यात तरुणांच्या महत्त्वपूर्ण भूमिकेवर अधिक भर दिला आहे.नवी दिल्ली येथील कमला नेहरु महाविद्यालयातील “विकसित भारत अंबॅसेडर – युवा कनेक्ट” या विद्यार्थ्यांच्या सक्रीय सहभागासह आयोजित कार्यक्रमात ते आज बोलत होते.
देशामध्ये परिवर्तन घडवून आणण्यासाठी आपण प्रथम युवकांमध्ये परिवर्तन घडवून आणले पाहिजे हे सांगण्यावर केंद्रीय मंत्र्यांनी भर दिला.हे साध्य करण्यासाठी आपण आपल्या युवकांच्या आकांक्षांना विकसित भारता’च्या संकल्पनेशी संलग्न करून त्यांना अधिक महत्त्वाकांक्षी, आत्मविश्वासपूर्ण आणि द्रष्टे बनवले पाहिजे असे ते म्हणाले.
साधनसंपत्तीची विस्तृत श्रेणी, संधी आणि साधने यांची सुलभ उपलब्धता करून देऊन देशातील तरुणांसाठी माय भारत या मंचाचे व्यापक, एक खिडकी मंचात रूपांतरण करण्याच्या सरकारच्या योजनेची देखील त्यांनी माहिती दिली. हा मंच युवकांसाठी असे एक-थांबा ठिकाण असेल जेथे त्यांना व्यावसायिक वृद्धीचे मार्ग शोधणे, मार्गदर्शकांशी संपर्क साधणेआणि राष्ट्र-उभारणीच्या कार्यात सक्रियपणे योगदान देणे शक्य होईल अशी माहिती मांडवीय यांनी दिली.
विकसित भारत युवा नेत्यांचा संवाद” – “राष्ट्रीय युवा महोत्सव 2025 या उपक्रमाविषयी बोलताना केंद्रीय मंत्री म्हणाले की,“यावर्षी हा महोत्सव नवी उंची गाठेल. या महोत्सवात राष्ट्रीय तसेच आंतरराष्ट्रीय पातळीवरील युवा नेते सहभागी होणार असून ते उपस्थित युवकांशी संवाद साधतील, स्वतःचे अनुभव त्यांच्याशी सामायिक करतील आणि त्यांना वर्ष 2047 पर्यंत विकसित भारताचे लक्ष्य साध्य करण्यात सक्रीय योगदान देण्यासाठी प्रोत्साहन देतील.हा कार्यक्रम तरुणांना नेते आणि आदर्श व्यक्तिमत्त्वे यांच्याशी जोडले जाण्यासाठी अनोखा मंच उपलब्ध करून देईल तसेच त्यांना देशाचे भविष्य घडवण्यात महत्त्वाची भूमिका बजावण्यासाठी सक्षम करेल,”
“विकसित भारत युवा नेत्यांचा संवाद” प्रश्नमंजुषा स्पर्धेतील पहिला टप्पा सुरु झाला असून माय भारत मंचावर त्यात थेट सहभागी होता येईल अशी घोषणा डॉ. मांडवीय यांनी यावेळी केली. तरुणांना त्यांच्या प्रतिभांचे आणि नाविन्यपूर्ण कल्पनांचे प्रदर्शन करता येईल अशा या आकर्षक संधीचा लाभ घेण्यासाठी नोंदणी करून स्पर्धेत सहभागी होण्याचे आवाहन त्यांनी तरुणांना केले.
समोर येणारी संधी लहान आहे की मोठी याचा विचार न करता तरुणांनी प्रत्येक संधीचा आत्मविश्वासाने लाभ घ्यावा असे प्रोत्साहन देत केंद्रीय मंत्री म्हणाले,“कोणतेही काम कधीच छोटे नसते.” अगदी लहानात लहान प्रयत्न देखील संपूर्ण समर्पित वृत्तीने केले तर ते यश मिळवण्यात आणि वैयक्तिक विकासाची जोपासना करण्यात महत्त्वाची भूमिका बजावतात हे सांगण्यावर त्यांनी भर दिला.
‘विकसित भारता’चे लक्ष्य साध्य करण्यात आपल्या परंपरांचा वापर करण्याचे महत्त्व देखील त्यांनी ठळकपणे सांगितले.