भारतातील माध्यमे आणि करमणुकीच्या क्षेत्रात कार्यरत मीडिया आणि एंटरटेनमेंट असोसिएशन ऑफ इंडिया ने (एमईएआय) भारत सरकारच्या माहिती आणि प्रसारण मंत्रालयाच्या सहकार्याने 30 नोव्हेंबर 2024 रोजी दिल्लीमध्ये `वॅम!` (वेव्स अॅनिमे अँड मंगा कॉन्टेस्ट) चे यशस्वी आयोजन केले . इंडियन इन्स्टिट्यूट ऑफ मास कम्युनिकेशन, दिल्ली येथे पार पडलेल्या या उपक्रमाच्या नव्या पर्वाने प्रेक्षकांना आकर्षित केले आणि भारतातील मंगा, अॅनिमे आणि वेबटून निर्मात्यांची प्रभावी सर्जनशील क्षमता प्रदर्शित केली.
गुवाहाटी, कोलकाता, भुवनेश्वर आणि वाराणसी येथील यशाची परंपरा कायम राखत `वॅम!` दिल्लीमध्ये मंगा (जपानी शैलीतील चित्रकथा ), वेबटून (डिजिटल चित्रकथा) आणि अॅनिमे (जपानी शैलीतील ऍनिमेशन ) या श्रेणींमध्ये 199 सहभागींनी आपली कला सादर केली. याशिवाय 28 उत्साही `कोसप्ले`(पात्रभूषा अभिनय) आणि `व्हॉइस अॅक्टिंग` (आवाज अभिनय) सहभागींनी प्रेक्षकांसमोर लोकप्रिय `अॅनिमे`आणि `गेमिंग` पात्रांना सजीव केले.
व्हिएतनामी अभिनेत्री, दिग्दर्शिका आणि निर्माती माई थू हुआन, अमेरिकन-व्हिएतनामी निर्माती आणि अभिनेत्री जॅकलिन थाओ गुयेन, मीडिया आणि एंटरटेनमेंट असोसिएशन ऑफ इंडियाचे अध्यक्ष सुशीलकुमार भसीन आणि उपाध्यक्ष . कमल पाहुजा यांच्या सहभागाने या उपक्रमाची रंगत वाढवली. यातील मुख्य आकर्षण ठरले ते बहुचर्चित `कोसप्ले` स्पर्धा. यामध्ये सहभागींच्या सर्जनशीलतेने आणि अचूकतेने `अॅनिमे` व `गेमिंग` पात्रांचे सजीव रूप साकारण्यात आले. कुशल 14 सहभागींनी `व्हॉइस अॅक्टिंग` स्पर्धेत भाग घेतला आणि भारतातील वाढत्या `परफॉर्मन्स आर्ट्स` कौशल्याची चुणूक दाखवली.
`वेव्ह्ज` (वर्ल्ड ऑडिओ व्हिज्युअल एंटरटेनमेंट समिट –https://wavesindia.org) चा एक भाग म्हणून `वॅम!` हे भारताच्या `अॅनिमेशन`, `गेमिंग` आणि `मंगा ` क्षेत्रांना नवा ऊर्जादायी दृष्टिकोन देण्यामध्ये अग्रेसर आहे. प्रत्येक शहरातून नवीन सर्जनशील कलाकारांना प्रेरित करत,नवकल्पनांना प्रोत्साहन देत आणि जगभरातील प्रेक्षकांना मोहवणाऱ्या या रंगीबेरंगी कलेचा उत्सव या अंतर्गत साजरा करण्यात येत आहे.