आयआरईएलइंडिया लिमिटेड ही भारत सरकारच्या अणुऊर्जा विभागाखालील केंद्रीय सार्वजनिक क्षेत्रातील कंपनी(सीपीएसई) व उस्त कामेनोगोर्स्क टायटॅनियम व मॅग्नेशियम प्लांट (यूकेटीएमपी जेएससी) कझाकस्तान यांनी भारतात टायटॅनियम स्लॅग उत्पादनासाठी आयआरईयूके टायटॅनियम लिमिटेड ही भारत कझाक संयुक्त उपक्रम कंपनी ( जेव्हीसी) स्थापन करण्यासाठी करार केला. या करारावर इंडियन रेअर अर्थ लिमिटेड (आयआरईएल) चे अध्यक्ष व व्यवस्थापकीय संचालक डॉ. दीपेंद्र सिंग व यूकेटीएमपी जेएससी च्या अध्यक्ष असीम मामुतोवा यांनी स्वाक्षऱ्या केल्या. या प्रसंगी भारत व कझाकस्तान चे उच्चस्तरीय अधिकारी उपस्थित होते.
या संयुक्त उपक्रमामुळे कमी प्रतीच्या इल्मेनाईटयुक्त कच्च्या मालापासून चांगल्या प्रतीचे टायटॅनियम तयार करण्यासाठी भारतात टायटॅनियमची व्हॅल्यू चेन विकसित होईल तसेच ओडिशा राज्यात रोजगारनिर्मितीही होईल. यूकेटीएमपी जेएससीशी झालेल्या सहमतीमुळे देशाची परकीय चलन गंगाजळी वाढीस लागेल व यूकेटीएमपी जेएससीला कच्च्या मालाचा खात्रीलायक स्रोत मिळेल. अशा रीतीने आयआरईएल व यूकेटीएमपी जेएससी यांच्या संयुक्त उपक्रमाद्वारे दोन्ही कंपन्यांची बाजारातील पत वाढेल व कझाकस्तान व भारत या दोन्ही देशांच्या टायटॅनियम व्हॅल्यू चेन मध्ये विकासाला मदत होईल.
ओडिशामध्ये आयआरईएलच्या नियमित उत्पादनप्रक्रयेतून अतिरिक्त इल्मेनाईट तयार होते. आपल्या दर्जेदार खनिज व दुर्मिळ खनिज मिश्रणाच्या पुरवठ्यासाठी आयआरईएल जगभरात ओळखली जाते. कझाकस्तानची यूकेटीएमपी जेएससी ही कंपनी कच्च्या खनिज मालाच्या उत्खननापासून ते टायटॅनियम स्पॉन्ज व तुकड्यांचे उत्पादन करणाऱ्या जगातील काही मोठ्या टायटॅनियम उत्पादकांपैकी एक गणली जाते. यूकेटीएमपी जेएससीच्या उत्पादनाला विमानवाहतूक क्षेत्रातील बोईंग व एअरबस सारख्या जागतिक स्तरावरील कंपन्यांकडून मान्यता मिळाली आहे. त्यांची 100 टक्के टायटॅनियम उत्पादने अतिविकसित देशांना निर्यात होत असतात.
ओडिशातून आयआरईएल ने मिळवलेले इल्मेनाईट वापरून टायटॅनियम व्हॅल्यू चेन द्वारे दोन्ही कंपन्यांच्या एकत्रित प्रयत्नातून टायटॅनियम स्लॅग चे उत्पादन करणे हे या संयुक्त उपक्रमाचे प्रमुख उद्दिष्ट आहे. या प्रकल्पातून टायटॅनियम स्लॅग तयार करण्यासाठी यूकेटीएमपी जेएससी तंत्रज्ञान पुरवेल व तयार झालेला स्लॅग पुढे टायटॅनियम स्पॉन्ज बनवण्यासाठी आपल्या कारखान्यात वापरेल.
याप्रसंगी बोलताना अणुऊर्जा विभागाचे सचिव डॉ ए के मोहंती यांनी आयआरईएल इंडिया लिमिटेड च्या प्रयत्नाचे कौतुक केले. भारताच्या अणुऊर्जा विभागाला 75 वर्षे पूर्ण होत असताना सुरु झालेल्या आयआरईयूके टायटॅनियम लिमिटेड या भारत कझाक संयुक्त उपक्रम कंपनी (जेव्हीसी) मुळे टायटॅनियम स्लॅग च्या उत्पादनात भारत लवकरच आत्मनिर्भर होईल असे ते म्हणाले.