जैवइंधनाच्या मिश्रणामुळे देशाच्या आयात खर्चात 91 हजार कोटी रुपयांची बचत होऊ शकते आणि हा निधी कृषिक्षेत्राच्या विकासासाठी वापरणे शक्य होईल,असे केंद्रीय पेट्रोलियम मंत्री हरदीप सिंग पुरी यांनी म्हटले आहे. बंगळुरू इथे आयोजित 27 व्या ऊर्जा तंत्रज्ञान संमेलनाचे उद्घाटन करत असताना ते आज बोलत होते. जागतिक स्तरावर जैवइंधन मिश्रणाच्या बाबतीत भारत दुसऱ्या क्रमांकावर आहे असे ते म्हणाले. वेळापत्रकापेक्षा पुष्कळच आधी पुढील वर्षापर्यंत भारत 20 टक्के जैवइंधन मिश्रणाचे लक्ष्य गाठेल असा विश्वास त्यांनी व्यक्त केला.
उच्च तंत्रज्ञान केंद्र आणि इंडियन ऑइल कॉर्पोरेशन च्या संयुक्त विद्यमाने आयोजित या तीन दिवसीय ऊर्जा तंत्रज्ञान संमेलनाचे आयोजन करण्यात आले आहे.यात 1200 प्रतिनिधी सहभागी झाले असून त्यात 60 शोधनिबंधांचे सादरीकरण होणार आहे.
या संमेलनात 23 तंत्रज्ञ त्यांच्या अद्ययावत तंत्रज्ञानाचे प्रदर्शन करणार आहेत. या संमेलनात पेट्रोलियम आणि नैसर्गिक वायू मंत्रालयाने 2023-24 या वर्षासाठी घोषित केलेले सर्वोत्कृष्ट ऊर्जा कार्यक्षम तंत्रज्ञानाचे पुरस्कार पेट्रोलियम मंत्र्यांच्या हस्ते देण्यात येणार आहेत.