गोव्यामध्ये 20 ते 28 नोव्हेंबर 2024 दरम्यान होणार असलेल्या 55व्या भारतीय आंतरराष्ट्रीय चित्रपट महोत्सवाच्या तयारीचा आढावा घेण्यासाठी माहिती आणि प्रसारण राज्यमंत्री डॉ.एल.मुरुगन यांनी आज प्रमुख हितधारकांसोबत एक बैठक घेतली.
या बैठकीदरम्यान, डॉ. मुरुगन यांनी या महोत्सवाचे आयोजन नीटनेटके आणि सुरळीत होण्यासाठी एकत्रित प्रयत्नांच्या आवश्यकतेवर भर दिला.गोव्याचा उत्सव साजरा करण्याचा सळसळता उत्साह आणि सांस्कृतिक विविधता यांचे प्रतिबिंब इफ्फीत दिसलेच पाहिजे,असे त्यांनी अधोरेखित केले. या महोत्सवाला एका नव्या उंचावर घेऊन जाण्यासाठी सर्व हितधारकांनी प्रामाणिकपणे एकमेकांना सहकार्य करावे,असे आवाहन त्यांनी केले.त्याबरोबरच भारतीय सिनेमाच्या विविधतेचा गौरव करणारा मंच म्हणून इफ्फीचे महत्त्व देखील त्यांनी अधोरेखित केले. “भारतीय सिनेमाची ओळख असलेल्या अनेकविध भाषा, संस्कृती आणि परंपरा यांचे प्रतिनिधित्व या महोत्सवाने करणे अतिशय महत्त्वाचे आहे. प्रादेशिक चित्रपटांपासून ते राष्ट्रीय स्तरावर गाजलेल्या ब्लॉकबस्टर्सपर्यंत इफ्फीने खऱ्या अर्थाने भारतीय सिनेमाच्या अनेकतावादाचे प्रतिबिंब दाखवले पाहिजे,”असे ते म्हणाले. डॉ. मुरुगन यांनी या महोत्सवाची जागतिक स्तरावरील पोहोच आणि दृश्यमानता वाढवण्याची जागतिक प्रसारमाध्यमांची क्षमता देखील अधोरेखित केली. इफ्फी केवळ जगभराचे लक्षच आपल्याकडे वेधून घेत नाही तर भारतीय सिनेमा आणि जागतिक प्रेक्षकवर्ग यांच्यात अर्थपूर्ण नातेसंबंध देखील प्रस्थापित करेल हे सुनिश्चित करण्यासाठी आंतरराष्ट्रीय माध्यम मंचांचा अतिशय चांगल्या पद्धतीने वापर करून घेण्याचे आवाहन त्यांनी सर्व हितधारकांना केले.
त्यानंतर डॉ. मुरुगन यांनी महोत्सवातील कार्यक्रमांच्या महत्त्वाच्या स्थळांना भेट दिली. त्यामध्ये गोवा मॅरिएट रीसॉर्ट आणि द प्रॉमेनेड या फिल्म बाजारच्या यजमान स्थळांचा समावेश होता. कला अकादमी आणि आयनॉक्स थिएटरला त्यांनी भेट दिली. इफ्फीतील चित्रपट प्रदर्शनाची ही दोन्ही ठिकाणे महत्त्वाची आहेत. ‘इफ्फीएस्टा’ कार्यक्रमाचे स्थळ असलेल्या डीबी ग्राउंडचीही त्यांनी पाहणी केली. मनोरंजनाचे हे मैदान यंदाच्या महोत्सवाचे प्रमुख आकर्षण आहे. महोत्सवाचे उद्घाटन आणि समारोप सोहळे जिथे होणार आहेत त्या डॉ. श्यामाप्रसाद मुखर्जी स्टेडिअमला मंत्र्यांनी भेट दिली. तसेच, ‘सफरनामा’चे स्थळ असलेल्या दरिया संगम या केंद्रीय संवाद विभागाच्या मल्टिमिडीया प्रदर्शनाची पाहणी त्यांनी केली.
बैठकीला गोवा सरकारचे प्रमुख सचिव डॉ. व्ही. कंदवेलु, माहिती आणि प्रसारण मंत्रालयाच्या पश्चिम विभागाच्या महासंचालक स्मिता वत्स शर्मा, राष्ट्रीय चित्रपट विकास महामंडळाचे व्यवस्थापकीय संचालक पृथुल कुमार, गोवा सरकारचे माहिती आणि जनसंपर्क सचिव रमेश वर्मा, उत्तर गोवा पोलिस अधीक्षक अक्षत कौशल, महत्त्वाच्या व्यक्तिंची सुरक्षा पाहणारे पोलिस अधीक्षक किरण पोडुवाल आणि एंटरटेन्मेंट सोसायटी ऑफ गोवाच्या महाव्यवस्थापक मृणाल वाळके यांच्यासह इतर वरिष्ठ अधिकारी उपस्थित होते.
डॉ. मुरुगन यांच्या स्थळभेटी आणि चर्चेमधून इफ्फी 2024 यशस्वी करण्याप्रती सरकारची अढळ वचनबद्धता अधोरेखित होते.