जी-20 शिखरपरिषदेनिमित्त रिओ दि जानेरो येथे दाखल झालेले पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आज तेथे नॉर्वेचे पंतप्रधान जोनास गार स्टोर यांची भेट घेतली.
दोन्ही देशांच्या पंतप्रधानांनी द्विपक्षीय संबंधांच्या प्रगतीचा आढावा घेतला आणि विविध क्षेत्रांतील सहकार्य अधिक बळकट करण्याच्या मार्गांविषयी चर्चा केली. India-EFTA-TEPA म्हणजेच भारत-युरोपीय मुक्त व्यापार संस्था- व्यापार आणि आर्थिक भागीदारी करार या करारावर स्वाक्षऱ्या होणे हा द्विपक्षीय संबंधांच्या वाटचालीतील मैलाचा दगड ठरेल असे उभय नेत्यांनी नमूद केले. तसेच नॉर्वेसह EFTAदेशांकडून भारतात गुंतवणूक आकर्षित करून घेण्याच्या दृष्टीने सदर कराराचे महत्त्व उभय नेत्यांनी अधोरेखित केले.
तसेच नील अर्थव्यवस्था, नूतनीकरणक्षम ऊर्जा, हरित हायड्रोजन, सौर आणि पवन ऊर्जा प्रकल्प, भू-औष्णिक ऊर्जा, हरित जहाजबांधणी/ हरित वाहतूक, CCUS म्हणजेच कार्बन अधिग्रहित करून वापरण्याचे आणि साठवण्याचे तंत्र, मत्स्यव्यवसाय, अंतराळ आणि आर्क्टिक अशा क्षेत्रांमध्ये सहकार्य वृद्धिंगत करण्यावर या द्विपक्षीय चर्चेत भर देण्यात आला.
त्याचप्रमाणे परस्पर स्वारस्याच्या प्रादेशिक आणि आंतरराष्ट्रीय मुद्द्यांवरही उभय नेत्यांनी चर्चा केली.