भारत हा डिजिटल जगाला शाश्वत पायाभूत सुविधा प्रदान करण्यासाठी सक्षम असणारा जगातील सर्वोत्तम देश आहे, असे केंद्रीय वाणिज्य आणि उद्योग मंत्री पीयूष गोयल यांनी आज नवी दिल्ली येथे ‘यूके इंडिया बिझनेस कौन्सिल’च्या ‘यूके-इंडिया टेक्नॉलॉजी फ्यूचर्स कॉन्फरन्स’मध्ये बोलताना सांगितले.
गोयल म्हणाले की, भविष्यात डिजिटल जग आणि शाश्वततेच्या मुद्द्यांचा परस्पर संबंध कसा असेल हे समजून घेणे महत्त्वाचे ठरेल. डेटा प्रोसेसिंग करणाऱ्या प्रणाली मोठ्या प्रमाणावर ऊर्जा वापरतील आणि त्याचा शाश्वततेवर परिणाम होईल. जगात फारच कमी ठिकाणी भारतासारखे एकत्रित ऊर्जेचे ग्रिड आहेत. 2030 पर्यंत भारतात पारंपरिक आणि नवीकरणीय ऊर्जा यांचा संतुलित समावेश असलेला 1000 गिगावॉटचा ग्रिड देशभर जोडलेला असेल, असे त्यांनी सांगितले.
डेटा केंद्रांसाठी इतक्या मोठ्या प्रमाणातील स्वच्छ ऊर्जा, अद्वितीय विश्वासार्हता आणि शाश्वतता प्रदान करते, असे सांगून गोयल यांनी जागतिक गुंतवणूकदारांसाठी भारतात अभूतपूर्व संधी असल्याचे अधोरेखित केले.
आज भारत ही जगातील सर्वात वेगाने विकसित होणारी दूरसंचार बाजारपेठ आहे आणि 5जी नेटवर्कचा सर्वात वेगवान विस्तार करणारा देश देखील आहे. लवकरच संपूर्ण भारत 5जी नेटवर्कने जोडला जाईल, असे त्यांनी सांगितले. तसेच, विकसित देशांशी संवाद साधण्यासाठी आवश्यक त्या परिसंस्था आणि पायाभूत सुविधा भारतात उपलब्ध आहेत, असेही त्यांनी नमूद केले.