शुक्रवार, नवंबर 22 2024 | 12:34:24 PM
Breaking News
Home / Choose Language / marathi / ‘सफरनामा’च्या उद्घाटनाने इफ्फीएस्टा ‘सफर’चा प्रारंभ

‘सफरनामा’च्या उद्घाटनाने इफ्फीएस्टा ‘सफर’चा प्रारंभ

Follow us on:

55 वा  इफ्फी  अर्थात भारतीय अंतरराष्ट्रीय चित्रपट महोत्सव, संगीत कला आणि संस्कृतीला मनोरंजनाच्या केंद्रस्थानी आणण्यासाठी वचनबद्ध आहे. त्याला अनुसरून, माहिती आणि प्रसारण मंत्रालयाचे सचिव संजय जाजू, आणि ख्यातनाम चित्रपट अभिनेता आणि निर्माता अक्किनेनी नागार्जुन राव, यांनी आज कला अकादमी, पणजी, गोवा येथे ‘सफरनामा: इव्होल्यूशन ऑफ इंडियन सिनेमा (भारतीय सिनेमाची उत्क्रांती)’ या प्रदर्शनाचे उद्घाटन केले. भारताची समृद्ध चित्रपट परंपरा आणि इतिहास, याबद्दलची माहिती लोकांपर्यंत पोहोचवण्यासाठी, माहिती आणि प्रसारण मंत्रालयाच्या केंद्रीय दळणवळण विभागाने हे मल्टी मिडिया प्रदर्शन आयोजित केले आहे.

उद्घाटन प्रसंगी संजय जाजू म्हणाले की, भारतीय चित्रपटाचा इतिहास हा राजा हरिश्चंद्र या चित्रपटापर्यंत मागे जातो, जेव्हा भारत वसाहतवादाच्या अमलाखाली होता. त्यावेळी देखील  भारताने सिनेमॅटिक भावना जोपासली, आणि ती परंपरा आजवर अबाधित आहे. या समृद्ध वारशाला सलाम करणे, आणि विशेषतः युवा प्रतिभावंतांपुढे ही परंपरा प्रदर्शित करून सिनेमा बद्दलची त्यांची आवड वाढवणे आणि त्यापासून मिळालेले समृद्ध सांस्कृतिक मूल्य जोपासणे, हे इफ्फीच्या या उपक्रमाचे उद्दिष्ट आहे.

चित्रपट हा भारतीयच असतो आणि त्यामध्ये कोणत्याही भाषेचे बंधन नसते, असे सुप्रसिद्ध अभिनेते नागार्जुन यांनी प्रसारमाध्यमांशी बोलताना अधोरेखित केले. त्यांचे वडील अक्किनेनी नागेश्वर राव, तसेच शताब्दी साजरी होत असलेले राज कपूर, मोहम्मद रफी आणि तपन सिन्हा हे दिग्गज कलाकार- यांनी प्रस्थापित केलेला वारसा खरोखर अभूतपूर्व आहे, असेही ते म्हणाले.

यावर्षीच्या इफ्फीमध्ये चित्रपट क्षेत्रातील राज कपूर, मोहम्मद रफी, तपन सिन्हा आणि अक्किनेनी नागेश्वर राव या चार दिग्गजांची शताब्दी साजरी केली जात आहे. ‘सफरनामा’ या प्रदर्शनात चार दीर्घिका या चौघांना समर्पित करण्यात आल्या आहेत. या चार चित्रतपस्वींचा सन्मान करणारी विशेष संकलित सामग्री आणि दुर्मिळ संग्रहित साहित्य या प्रदर्शनात मांडण्यात आले आहे. यामध्ये भित्तचित्रे, ध्वनीचित्रफिती आणि विशेष आठवणी यांचा समावेश असून भारतीय चित्रपटसृष्टीला आकार देणाऱ्या या सार्वकालिक महान व्यक्तिमत्त्वांना त्या माध्यमातून आदरांजली वाहण्यात आली आहे.

20 ते 28 नोव्हेंबर 2024 या कालावधीत सर्वसामान्य जनतेला हे प्रदर्शन खुले असेल. भारतीय सिनेमाच्या प्रारंभिक काळापासून ते आताच्या समकालीन नवोन्मेषापर्यंत सिनेसृष्टीचा प्रवास गतिशील पद्धतीने या प्रदर्शनातून अनुभवता येतो. या प्रदर्शनाला शालेय विद्यार्थ्यांची मोठी उपस्थिती अपेक्षित असून यातून तरुण पिढीला एक शैक्षणिक अनुभव देण्याचा मनोदय आहे. या प्रदर्शनात प्रोजेक्शन मॅपिंग , व्हर्चुअल रिऍलिटी, ऑगमेंटेड रिऍलिटी , डिजिटल प्रश्नमंजूषा आणि डिजिटल कोडी अशा अद्ययावत तंत्रज्ञानाच्या घटकांचा अंतर्भाव करण्यात आला आहे.

या कार्यक्रमात माहिती आणि प्रसारण मंत्रालयाचे सचिव संजय जाजू यांच्या हस्ते केटीबी- भारत हैं हम, ॲनिमेशन मालिका सीझन-2 चा प्रारंभ  करण्यात आला. स्वातंत्र्य सैनिकांवरील ॲनिमेटेड मालिका 1 डिसेंबरपासून दूरदर्शन, नेटफ्लिक्स, प्राइम व्हिडिओ आणि वेव्‍हजवर प्रसारित होईल. तसेच आकाशवाणीवर रेडिओ मालिका आणि ‘स्‍पॉटीफाय’ वर पॉडकास्ट प्रसारित होईल. ही मालिका हिंदी, तमिळ, तेलुगु, कन्नड, मल्याळम, पंजाबी, मराठी, गुजराती, बंगाली, आसामी आणिए उडिया यासह 12 भारतीय भाषांमध्ये आणि फ्रेंच, जर्मन, स्पॅनिश, रशियन, कोरियन, चिनी, अरबी अशा सात आंतरराष्ट्रीय भाषांमध्ये उपलब्ध असेल. तसेच  150 देशांमधील  प्रेक्षकांना सहज पाहता येईल. त्यामुळे या मंचाची पोहोच आणखी वाढवणार आहे.

उद्घाटन प्रसंगी, दूरदर्शनची परंपरा आणि प्रसार भारतीचा नवीन ओटीटी उपक्रम, वेव्‍हज चे भविष्य दर्शविणारे एक ‘सिग्नेचर’  गाणे देखील प्रकाशित करण्यात आले.

उद्घाटन दरम्यान प्रसार भारतीचे मुख्‍य कार्यकारी अधिकारी गौरव द्विवेदी, सीबीसीचे महासंचालक योगेश बावेजा, कार्यक्रमाचे निर्माते  मुंजाल श्रॉफ आणि ग्रॅफिटी स्टुडिओचे टिळक शेट्टी; नेटफ्लिक्स -इंडियाच्‍या सार्वजनिक धोरण संचालक महिमा कौल, आणि प्राइम व्हिडिओच्‍या एसव्‍हीओडी प्रमुख आणि संचालक शिलांगी मुखर्जी  उपस्थित होत्या.

मित्रों,
मातृभूमि समाचार का उद्देश्य मीडिया जगत का ऐसा उपकरण बनाना है, जिसके माध्यम से हम व्यवसायिक मीडिया जगत और पत्रकारिता के सिद्धांतों में समन्वय स्थापित कर सकें। इस उद्देश्य की पूर्ति के लिए हमें आपका सहयोग चाहिए है। कृपया इस हेतु हमें दान देकर सहयोग प्रदान करने की कृपा करें। हमें दान करने के लिए निम्न लिंक पर क्लिक करें -- Click Here


* 1 माह के लिए Rs 1000.00 / 1 वर्ष के लिए Rs 10,000.00

Contact us

Check Also

हिंद-प्रशांत क्षेत्रातील शांतता आणि समृद्धीसाठी नियम-आधारित आंतरराष्ट्रीय व्यवस्थेसाठी भारताचे समर्थन : लाओ पीडीआरमध्ये 11 व्या आसियान संरक्षण मंत्र्यांच्या बैठकीत राजनाथ सिंह यांचे प्रतिपादन

“हिंद-प्रशांत क्षेत्रामध्ये जल अथवा नभ अशा कोणत्‍याही क्षेत्रातील पर्यटन, व्यवसाय, उद्योग यांच्‍यासाठी  स्वातंत्र्य, विनाअडथळा कायदेशीर …