राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांनी आज (25 ऑक्टोबर 2024) रायपूरच्या अखिल भारतीय आयुर्विज्ञान संस्थेच्या (एम्स) दुसऱ्या दीक्षांत समारंभाला संबोधित केले.
कमी खर्चात चांगली आरोग्य सेवा आणि वैद्यकीय शिक्षण देण्याची एम्सची ख्याती आहे. लोकांचा विश्वास एम्सशी निगडित आहे. त्यामुळेच एम्समध्ये उपचार घेण्यासाठी ठिकठिकाणाहून मोठ्या संख्येने लोक येतात असे राष्ट्रपतींनी यावेळी नमूद केले.
डॉक्टरांना संबोधित करताना, राष्ट्रपती म्हणाल्या की संपन्न लोकांकडे अनेक पर्याय असू शकतात परंतु वंचितांच्या आशा त्यांच्यावर निर्भर असतात. सर्व लोकांची, विशेषतः गरीब आणि वंचितांची सेवा करण्याचा सल्ला त्यांनी डॉक्टरांना दिला.
वैद्यकीय व्यावसायिकांचे काम अत्यंत जबाबदारीचे असून त्यांचे निर्णय अनेकदा जीवनदानाशी निगडित असतात. वैद्यकीय व्यावसायिक म्हणून, त्यांना अनेकदा आव्हानात्मक परिस्थितींचा सामना करावा लागतो. या आव्हानांना तोंड देण्यासाठी आपल्या भावनांवर नियंत्रण ठेवायला शिकण्याचा सल्ला राष्ट्रपतींनी डॉक्टरांना दिला.
राष्ट्रपती म्हणाल्या की, विद्यार्थी दशेतून बाहेर पडून व्यावसायिक जीवनाची वाटचाल हा एक मोठा बदल असल्याचे निदर्शनास आणून देताना राष्ट्रपतींनी पदवीधर डॉक्टरांना त्यांचे ज्ञान अद्ययावत ठेवण्यास सुचवले. नेहमी काहीतरी नवीन शिकण्याची आस त्यांच्यासाठी फायदेशीर ठरेल, असे त्या म्हणाल्या.