केंद्रीय वस्त्रोद्योग मंत्र्यांच्या अध्यक्षतेखालील 10 व्या अभियान सुकाणू गटाच्या बैठकीत राष्ट्रीय तांत्रिक वस्त्रोद्योग अभियानांतर्गत 13.3 कोटी रुपयांच्या 12 संशोधन प्रकल्पांना मंजुरी देण्यात आली, मंजूर करण्यात आलेले संशोधन प्रकल्प जिओटेक्स्टाइल, शाश्वत आणि स्मार्ट वस्त्रोद्योग, संमिश्र इत्यादी महत्त्वाच्या धोरणात्मक क्षेत्रांशी संबंधित आहेत. मंजूर झालेले प्रकल्प IITs, NITs, CRRI, यांसह इतर आघाडीच्या संशोधन संस्थांनी प्रस्तावित केलेले आहेत. अभियानाअंतर्गत मंजूर झालेल्या संशोधन प्रकल्पांची एकूण संख्या आता 168 झाली असून त्यांचे एकूण मूल्य अंदाजे 509 कोटी रुपये आहे.
अभियानांतर्गत नवीन आयपीआर मार्गदर्शक तत्त्वे जारी करताना, गिरीराज सिंह यांनी उद्योगांना संशोधन प्रकल्पांमध्ये सक्रियपणे सहभागी होण्याचे आवाहन केले.
राष्ट्रीय तांत्रिक वस्त्रोद्योग अभियान ही वस्त्रोद्योग मंत्रालयाची महत्त्वाची योजना असून विशेषतः उच्च कार्यक्षमतेचे धागे विकसित करण्यासाठी स्थानिक उद्योगाच्या संशोधन आणि विकास क्षमता विकसित करणे हा त्याचा मुख्य उद्देश आहे.