फायनान्शियल एक्सप्रेस ने 16 नोव्हेंबर 2024 रोजी ‘Railways floats ₹20,000-cr RFP for camera in coaches’ या मथळ्याखाली छापलेल्या लेखास आणि अन्य प्रसिद्धीमाध्यमांनी प्रकाशित केलेल्या तत्सम वृत्तांना प्रत्युत्तर म्हणून ही माहिती प्रकाशित करण्यात येत आहे.’रेल्वे डब्यांमध्ये आयपी- सीसीटीव्ही देखरेख प्रणाली जोडण्याच्या’ भारतीय रेल्वेच्या उपक्रमाविषयी- या वृत्तांमध्ये दिशाभूल करणारी आणि खोटी माहिती देण्यात आली आहे. यातून सदर प्रकल्पाच्या व्याप्ती, खर्च आणि प्रगतीविषयी चुकीची प्रतिमा निर्माण होत आहे.
आम्ही या दाव्याचा स्पष्टपणे इन्कार करीत आहोत आणि सदर प्रकल्पाच्या बिड डॉक्युमेंटचा (बोली लावण्याची कागदपत्रे) वित्तीय आढावा घेण्याचे काम अद्यापि सुरू आहे आणि त्यास अंतिम स्वरूप प्राप्त झालेले नाही, असे स्पष्ट करीत आहोत. फायनान्शियल एक्सप्रेस आणि अन्य माध्यमांनी केलेला दाव्यांच्या अगदी उलट परिस्थिती प्रत्यक्षात असून, कोणतीही निविदा किंवा एनआयटी म्हणजे निविदा मागवणारी सूचना प्रकाशित करण्यात आलेली नाही. यासंदर्भात प्रकाशित करण्यात आलेली आकडेवारी आणि निर्धारित मुदत हे केवळ अंदाज असून त्याला वास्तवाचा आधार नाही.
माध्यम संस्थांनी पत्रकारितेच्या तत्त्वांशी एकनिष्ठ राहावे व त्यांच्याकडे आलेली माहिती प्रकाशित करण्यापूर्वी अधिकृत स्रोतांमधून पडताळून घ्यावी असे आवाहन आम्ही करीत आहोत. तपासून न पाहिलेले आणि निराधार दावे प्रकाशित करण्याने भारतीय रेल्वेची प्रतिमा मलीन होते आणि जनतेची दिशाभूल होते.
भागधारकांना आणि जनतेला आवाहन-
पारदर्शकता सुरक्षितता आणि कार्यक्षमता यासाठीच्या वचनबद्धतेचा भारतीय रेल्वे पुनरुच्चार करत आहे. सर्व माध्यम संस्थांनी आणि जनतेने, केवळ भारतीय रेल्वेच्या किंवा पत्र सूचना कार्यालयाच्या अधिकृत संदेशांवरच विश्वास ठेवावा असे आवाहन आम्ही करत आहोत.