सोमवार, नवंबर 25 2024 | 11:03:52 AM
Breaking News
Home / Choose Language / marathi / पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी ‘मन की बात’ (116 वा भाग) कार्यक्रमातून देशवासियांशी साधलेला संवाद

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी ‘मन की बात’ (116 वा भाग) कार्यक्रमातून देशवासियांशी साधलेला संवाद

Follow us on:

माझ्या प्रिय देशवासियांनो, नमस्कार! ‘मन की बात’ म्हणजे देशाच्या सामूहिक प्रयत्नांची गोष्ट, देशाच्या यशाची गोष्ट, लोकांच्या सामर्थ्याची गोष्ट, ‘मन की बात’ म्हणजे देशातील युवा वर्गाची स्वप्नं आणि देशातील नागरिकांच्या आकांक्षांबद्दलची गोष्ट! मी पूर्ण महिनाभर ‘मन की बात’ ची वाट पाहत असतो, जेणेकरून मला तुमच्याशी थेट संवाद साधता येईल. इतके संदेश, कितीतरी संदेश! मी शक्य तितके जास्तीत जास्त संदेश वाचण्याचा आणि तुमच्या सूचनांवर विचार करण्याचा प्रयत्न करत असतो.

मित्रांनो, आजचा दिवस खूप विशेष आहे – आज एनसीसी दिवस आहे. एनसीसी चा विषय निघताच आपले शाळा-महाविद्यालयांचे दिवस आठवतात. मी स्वतः देखील एनसीसी कॅडेट राहिलो आहे, त्यामुळे मी पूर्ण आत्मविश्वासाने सांगू शकतो की यातून मिळालेला अनुभव माझ्यासाठी अमूल्य आहे. ‘एनसीसी’, तरुण-तरुणींमध्ये शिस्त, नेतृत्व आणि सेवेची भावना रुजवते. तुम्ही तुमच्या आजूबाजूला पाहिलं असेल की, कोणतीही आपत्ती आली असेल, मग ती पूरपरिस्थिती असो, भूकंप असो, कोणतीही दुर्घटना असो, एनसीसी चे कॅडेट्स मदतीला नक्कीच धावून जातात. आज देशात एनसीसी ला मजबूत करण्यासाठी सातत्याने काम होत आहे. 2014 मध्ये, एनसीसीत सुमारे 14 लाख तरुण-तरुणी होते. आता 2024 मध्ये 20 लाखांहून अधिक तरुण-तरुणी एनसीसी मध्ये आहेत. पूर्वीच्या तुलनेत आता आणखी पाच हजार नवीन शाळा आणि महाविद्यालयांमध्ये एनसीसी ची सुविधा उपलब्ध आहे आणि सर्वात महत्त्वाची बाब म्हणजे पूर्वी एनसीसी मध्ये कॅडेट्स म्हणून मुलींची संख्या फक्त 25 टक्क्यांच्या आसपास होती. आता एनसीसी मध्ये मुलींची संख्या जवळपास 40 टक्के झाली आहे. सीमाभागात राहणाऱ्या अधिकाधिक तरुण-तरुणींना एनसीसी मध्ये सामावून घेण्याची मोहीमही सातत्याने सुरू आहे. मी तरुण-तरुणींना एनसीसीमध्ये जास्तीत जास्त संख्येने सहभागी होण्याचे आवाहन करतो. तुम्ही असं पहा की… तुम्ही शिक्षणाची कोणतीही वाट निवडा, तुमचं व्यक्तीमत्व घडण्यासाठी एनसीसी ची खूप मदत होईल.

मित्रांनो, विकसित भारत घडवण्यात युवावर्गाची भूमिका खूप मोठी आणि महत्वाची आहे. जेव्हा तरुण मन एकत्र येऊन, देशाच्या भावी प्रवासाबाबत विचारमंथन करतं, चर्चा करतं, तेव्हा निश्चितच त्यातून दिशा दाखवणारे ठोस मार्ग निघतात. तुम्हाला माहीत आहे की, देश 12 जानेवारीला स्वामी विवेकानंदांच्या जयंती दिवशी ‘युवा दिन’ साजरा करतो. पुढील वर्षी स्वामी विवेकानंदांची 162 वी जयंती आहे.  यावेळी ही जयंती, विशेष प्रकारे साजरी केली जाणार आहे. यानिमित्ताने 11-12 जानेवारी रोजी दिल्लीतील भारत मंडपम इथे युवा विचारांचा महामेळावा होणार असून, ‘विकसित भारत युवा नेते संवाद’ असे या उपक्रमाचे नाव आहे. भारतभरातून कोट्यवधी तरुण-तरुणी यात सहभागी होणार आहेत. गाव, ब्लॉक म्हणजे गट, जिल्हा, राज्य आणि तिथून निवडलेले असे दोन हजार तरुण-तरुणी भारत मंडपम इथे, ‘विकसित भारत यंग लीडर्स डायलॉग’ अर्थात विकसित भारत युवा नेते संवादा साठी जमतील.  तुम्हाला आठवत असेल की, लाल किल्ल्याच्या तटबंदीवरून मी अशा तरुण-तरुणींना राजकारणात येण्याचे आवाहन केले होते, ज्यांच्या कुटुंबातील एखाद्या व्यक्तीला किंवा संपूर्ण कुटुंबाला, राजकीय पार्श्वभूमी नाही….तर अशा एक लाख तरुण-तरुणींना, नवोदीत तरुण-तरुणींना राजकारणात सामावून घेण्यासाठी देशभरात विशेष उपक्रम राबवण्यात येणार आहेत. ‘विकसित भारत यंग लीडर्स डायलॉग’ देखील असाच एक उपक्रम आहे.  यासाठी देश-परदेशातील तज्ज्ञ येणार आहेत.  अनेक राष्ट्रीय-आंतरराष्ट्रीय वलयांकित मान्यवर देखील उपस्थित राहणार आहेत. मीही त्यात यथाशक्ती जास्तीत जास्त वेळ उपस्थित राहीन.  तरुण-तरुणींना त्यांच्या कल्पना थेट आमच्यासमोर मांडण्याची संधी मिळेल. देश, या कल्पनांना कशाप्रकारे मूर्त स्वरूप देऊ शकेल…. कसा एक ठोस रोडमॅप- निश्चित कृती आराखडा तयार करता येईल…..  याची ब्ल्यू प्रिंट तयार केली जाईल… तेव्हा सज्ज व्हा…जे भारताचे भविष्य घडवणार आहेत, जे देशाची भावी पिढी आहेत त्यांच्यासाठी ही मोठी संधी आहे. आपण मिळून देश घडवूया आणि देशाचा विकास करूया.

माझ्या प्रिय देशवासियांनो, ‘मन की बात’ मध्ये आपण अनेकदा अशा तरुणाईबद्दल बोलतो.  असे अनेक तरुण-तरुणी आहेत जे निस्वार्थपणे समाजासाठी काम करत आहेत आणि लोकांच्या छोट्या छोट्या समस्यांवर उपाय शोधण्यासाठी झटत आहेत. आपण आपल्या आजूबाजूला बघितले तर आपल्याला असे अनेक लोक दिसतात ज्यांना कुठल्यातरी मदतीची किंवा कसल्यातरी माहितीची गरज असते. मला हे जाणून बरं वाटलं की काही तरुणांनी गट बनवून अशाही काही समस्यांचं निराकरण करण्याचा प्रयत्न केला आहे…जसे की लखनऊचे वीरेंद्र म्हणून रहिवासी आहेत…ते डिजिटल लाइफ सर्टिफिकेट म्हणजे हयातीचा दाखला डिजिटल स्वरूपात मिळवून देण्याच्या कामात ज्येष्ठ नागरिकांना मदत करत असतात. तुम्हाला माहीत आहे की, नियमाप्रमाणे सर्व निवृत्तीवेतनधारकांना वर्षातून एकदा हयातीचा दाखला जमा करायचा असतो. 2014 पर्यंत यासाठीची प्रक्रिया अशी होती की ज्येष्ठ नागरिकांना स्वतः बँकांमध्ये जाऊन हा दाखला जमा करावा लागत होता….. आपण कल्पना करू शकता की यामुळे आपल्या ज्येष्ठ नागरिकांची किती गैरसोय होत होती. आता ही प्रक्रिया बदलली आहे. आता, हयातीचे दाखले डिजिटल स्वरूपात मिळू लागल्यामुळे ही प्रक्रिया खूप सुलभ झाली आहे… ज्येष्ठ नागरिकांना बँकेत जावं लागत नाही. ज्येष्ठ नागरिकांना तंत्रज्ञानाच्या वापरात कुठलीही अडचण येऊ नये म्हणून वीरेंद्र सारखे अनेक तरुण योगदान देत आहेत. ते आपापल्या भागातील ज्येष्ठ नागरिकांना याबाबत जागृत करत असतात. एवढेच नाही… ते ज्येष्ठ नागरिकांना तंत्रज्ञान स्नेही सुद्धा बनवत आहेत. अशाच प्रयत्नांमुळे आज डिजिटल स्वरूपात हयातीचा दाखला मिळवणाऱ्यांची संख्या 80 लाखाच्या वर गेली आहे… यापैकी दोन लाखाहून जास्त ज्येष्ठ नागरिक असे आहेत, ज्यांनी वयाची 80 वर्ष ओलांडली आहेत.

मित्रांनो, अनेक शहरांमध्ये युवा वर्ग, ज्येष्ठ नागरिकांना डिजिटल क्रांतीमध्ये सामावून घेण्यासाठी पुढे येत आहे. भोपाळच्या महेश यांनी आपल्या भागातील अनेक ज्येष्ठांना स्मार्ट फोनद्वारे आर्थिक व्यवहार करायला शिकवले आहे. या ज्येष्ठांकडे स्मार्टफोन तर होते, मात्र त्यांचा योग्य उपयोग कसा करायचा हे त्यांना सांगणारं कुणी नव्हतं. ज्येष्ठ नागरिकांना डिजिटल अरेस्ट म्हणजे डिजिटल व्यवहारांमधून होणाऱ्या अटके सारख्या धोक्यांपासून वाचवण्यासाठी सुद्धा अनेक तरुण-तरुणी पुढे आले आहेत. अहमदाबादचे राजीव, लोकांना डिजिटल अटकेच्या धोक्याबाबत जागरुक करत असतात. मी, ‘मन की बात’ च्या मागील भागात, डिजिटल अटकेबाबत चर्चा केली होती. अशा प्रकारच्या गुन्ह्यांना, ज्येष्ठ नागरिकच जास्तीत जास्त बळी  पडतात. अशा परिस्थितीत आपली ही जबाबदारी आहे की आपण त्यांना जागरूक केलं पाहिजे आणि सायबर घोटाळ्यांपासून वाचवण्यात त्यांना मदत केली पाहिजे. आपल्याला लोकांना हे वारंवार समजवावं लागेल की सरकारी प्रक्रियेमध्ये डिजिटल अटक या प्रकाराची तरतूदच नाही. हे धादांत असत्य… लोकांना फसवण्याचे कारस्थान आहे. मला आनंद वाटतो की आपले तरुण मित्र या कामात पूर्ण संवेदनशीलतेने सहभागी होत आहेत आणि इतरांनाही प्रेरणा देत आहेत.

माझ्या प्रिय देशवासियांनो, आजकाल मुलांच्या शिक्षणाबाबत अनेक प्रकारचे प्रयोग केले जात आहेत. प्रयत्न हाच आहे की आपल्या मुलांमध्ये सृजनशीलता वाढावी आणि पुस्तकांबद्दलचं प्रेम आणखी वाढावं. असंही म्हटलं जातं की पुस्तकं माणसाची सर्वात जास्त चांगले मित्र असतात आणि आता ही मैत्री घट्ट करण्यासाठी ग्रंथालयापेक्षा आणखी चांगली जागा ती कोणती असेल?  मी, चेन्नईचे एक उदाहरण तुम्हाला सांगू इच्छितो. इथे मुलांसाठी असं एक वाचनालय तयार करण्यात आलं आहे, जे सर्जनशीलता आणि शिकण्याचं केंद्र बनलं आहे. हे प्रकृत अरिवगम म्हणून ओळखलं जातं.  या ग्रंथालयाची कल्पना, तंत्रज्ञानाच्या जगाशी निगडित असलेल्या श्रीराम गोपालनजींच्या योगदानातून साकारली आहे. परदेशात आपलं काम करताना ते अत्याधुनिक तंत्रज्ञानाच्या जगाशी जोडले गेले. मात्र सोबतच त्यांनी, मुलांमध्ये वाचनाची आणि शिकण्याची आवड रुजवण्याचाही विचार केला. भारतात परतल्यानंतर त्यांनी प्रकृत अरिवगम तयार केले.  यात तीन हजारांहून अधिक पुस्तके आहेत, जी वाचण्यासाठी मुलांमध्ये चढाओढ लागलेली असते. पुस्तकांशिवाय या ग्रंथालयात होणारे अनेक उपक्रमही मुलांना आकर्षित करतात.  कथाकथनाची सत्रे असोत, कला कार्यशाळा असोत, स्मृती संवर्धन प्रशिक्षण वर्ग असोत, रोबोटिक्स म्हणजे यंत्रमानव तंत्राचे धडे असोत किंवा पब्लिक स्पीकिंग-सार्वजनिक संभाषण असो, प्रत्येकासाठी आनंद घेण्यासारखे काहीतरी आहे जे त्यांच्या आवडीचे आहे.

मित्रांनो, हैदराबादमध्येही ‘फूड फॉर थॉट’ फाऊंडेशनने अनेक अनोखी ग्रंथालये निर्माण केली आहेत. त्यांचाही जास्तीत जास्त प्रयत्न हाच असतो की मुलांना जास्तीत जास्त विषयांची ठोस माहिती असलेली पुस्तके वाचायला मिळावीत. बिहारमध्ये गोपालगंजच्या ‘प्रयोग लायब्ररी’ या ग्रंथालयाची चर्चा  तर आसपासच्या अनेक शहरांमध्ये होऊ लागली आहे. या ग्रंथालयातून सुमारे 12 गावातील तरुण-तरुणींना पुस्तके वाचण्याची सुविधा मिळू लागली आहे, यासोबतच या वाचनालयाच्यावतीने इतर आवश्यक सुविधाही  उपलब्ध करून देण्यात येत आहेत. काही ग्रंथालये तर अशी आहेत जी विद्यार्थ्यांना स्पर्धा परीक्षांच्या तयारीसाठी अतिशय उपयुक्त ठरत आहेत. हे पाहून खरोखरच खूप आनंद होतो की समाजाच्या सक्षमीकरणासाठी आज वाचनालयांचा खूप चांगला उपयोग होत आहे.  तुम्हीही पुस्तकांशी मैत्री वाढवा, आणि पहा… तुमचे जीवन कसे बदलते!

माझ्या प्रिय देशवासियांनो, मी परवा रात्रीच दक्षिण अमेरिकेतील गयाना या देशातून परतलो आहे. भारतापासून हजारो किलोमीटर दूर, गयानामध्येही एक ‘मिनी भारत’ वसला आहे.  सुमारे 180 वर्षांपूर्वी गयानात, भारतातील लोकांना शेतात काम करण्यासाठी आणि इतर कामांसाठी नेण्यात आले होते. आज गयानामधील भारतीय वंशाचे लोक, राजकारण, व्यवसाय, शिक्षण आणि संस्कृती या प्रत्येक क्षेत्रात गयानाचे नेतृत्व करत आहेत. गयानाचे अध्यक्ष डॉ. इरफान अली हे देखील भारतीय वंशाचे आहेत, ज्यांना आपल्या भारतीय वारशाचा अभिमान आहे. मी गयानामध्ये असताना माझ्या मनात एक विचार आला – जो मी तुम्हाला ‘मन की बात’ मध्ये सांगत आहे.  गयानाप्रमाणेच जगातील डझनभर देशांमध्ये लाखो भारतीय आहेत. काही दशकांपूर्वीच्या, 200-300 वर्षांपूर्वीच्या… त्यांच्या पूर्वजांच्या… स्वतःच्या अशा कथा आहेत. भारतीय स्थलांतरितांनी वेगवेगळ्या देशांमध्ये आपला ठसा कसा उमटवला याच्या कथा तुम्हाला सापडतील का! तिथल्या स्वातंत्र्यलढ्यात त्यांनी कसा भाग घेतला! त्यांनी आपला भारतीय वारसा कसा जिवंत ठेवला? माझी अशी इच्छा आहे की तुम्ही अशा सत्य कथा शोधाव्यात आणि त्या मला सांगाव्यात. तुम्ही या कथा नमो ॲपवर किंवा MyGov वर, #IndianDiasporaStories या हॅशटॅग वर  देखील शेअर करू शकता.

मित्रांनो, ओमानमध्ये सुरू असलेला एक अनोखा प्रकल्पही तुम्हाला खूप मनोरंजक वाटेल.  ओमानमध्ये अनेक भारतीय कुटुंबे अनेक शतकांपासून राहत आहेत. त्यापैकी बहुतांश, गुजरातमधील कच्छमधून स्थायिक झाली आहेत. या लोकांनी व्यापाराचे महत्त्वाचे दुवे निर्माण केले होते. आजही त्यांच्याकडे ओमानी नागरिकत्व आहे, पण भारतीयत्व त्यांच्या नसानसात भिनले आहे. ओमानमधील भारतीय दूतावास आणि भारतीय राष्ट्रीय अभिलेखागार यांच्या संयुक्त विद्यमाने एका पथकाने, या कुटुंबांचा इतिहास जतन करण्याचे काम सुरू केले आहे. या मोहिमेअंतर्गत आतापर्यंत, हजारो कागदपत्रे जमा करण्यात आली आहेत. यामध्ये रोजनिशी, खाते वही, लेजर- नोंदवही, पत्रे आणि तारा यांचा समावेश आहे. यातील काही कागदपत्रे 1838 सालातील देखील आहेत. ही कागदपत्रे भावनांनी ओथंबलेली आहेत. अनेक  वर्षांपूर्वी जेव्हा ते ओमानला पोहोचले तेव्हा त्यांनी कोणत्या प्रकारचे जीवन अनुभवले, कोणत्या प्रकारच्या सुख-दुःखाचा सामना केला आणि ओमानच्या लोकांशी त्याचे संबंध कसे वाढले – हे सर्व या कागदपत्रां मध्ये सामावले आहे. ‘ओरल हिस्ट्री प्रोजेक्ट’ हा मौखिक इतिहास प्रकल्प देखील या उपक्रमाचा महत्त्वाचा आधार आहे. या उपक्रमात, तेथील ज्येष्ठांनी आपले अनुभव सांगितले आहेत.  लोकांनी तिथल्या त्यांच्या राहणीमानाशी संबंधित गोष्टी, सविस्तरपणे सांगितल्या आहेत.

मित्रांनो, असाच एक ‘ओरल हिस्ट्री प्रोजेक्ट’ भारतातही सुरू आहे. या प्रकल्पा अंतर्गत, देशाच्या फाळणीच्या काळात बळी गेलेल्यांचे अनुभव, इतिहासप्रेमी गोळा करत आहेत. आता देशात असे फार कमी लोक उरले आहेत ज्यांनी फाळणीची भीषणता पाहिली- अनुभवली आहे.  अशा परिस्थितीत हा प्रयत्न अधिक महत्त्वाचा ठरला आहे.

मित्रांनो, जो देश, जे स्थान, आपला इतिहास जपतात, त्यांचे भविष्यही सुरक्षित राहते. हाच विचार करून गावांचा इतिहास जतन करण्यासाठी एक डिरेक्टरी-निर्देशिका तयार करण्याचा प्रयत्न करण्यात आला आहे.  भारताच्या सागरी प्रवासाच्या प्राचीन क्षमतेशी संबंधित पुरावे जतन करण्याची मोहीमही देशात सुरू आहे. या अनुषंगाने लोथलमध्ये एक मोठे संग्रहालय देखील बनवले जात आहे, जर तुमच्याकडे कोणतेही हस्तलिखित, कोणतेही ऐतिहासिक दस्तऐवज, कोणत्याही हस्तलिखिताची प्रत असेल तर तुम्ही ती भारतीय राष्ट्रीय अभिलेखागाराच्या मदतीने जतन करू शकता.

मित्रांनो, मला स्लोव्हाकियामध्ये होत असलेल्या अशाच आणखी एका प्रयत्नाची माहिती मिळाली आहे जो आपल्या संस्कृतीचे जतन आणि संवर्धन करण्याशी संबंधित आहे. इथे प्रथमच, आपल्या उपनिषदांचा स्लोव्हाक भाषेत अनुवाद  झाला आहे. या प्रयत्नांतून भारतीय संस्कृतीचा जागतिक प्रभावही दिसून येतो. आपल्या सर्वांसाठी ही अभिमानाची गोष्ट आहे की जगभरात असे कोट्यवधी लोक आहेत ज्यांच्या हृदयात भारत वसतो.

या प्रयत्नांमधून भारतीय संस्कृतीचा जागतिक प्रभावही दिसून येतो. आपल्या सर्वांसाठी ही अभिमानाची गोष्ट आहे की जगभरात करोडो लोक आहेत ज्यांच्या हृदयात भारत वसतो.

माझ्या प्रिय देशबांधवांनो, आता मला तुमच्यासोबत देशाच्या अशा एक अशी कामगिरीबद्दल सांगायची आहे जे ऐकून तुम्हाला आनंद आणि अभिमान वाटेल आणि जर तो नाही वाटला तर कदाचित तुम्हाला पश्चातापही होईल. काही महिन्यांपूर्वी आपण ‘एक पेड माँ के नाम’ म्हणजेच ‘एक वृक्ष आईच्या नावाने’ ही मोहीम सुरू केली. या मोहिमेत देशभरातील लोक मोठ्या उत्साहाने सहभागी झाले होते. मला सांगायला अतिशय आनंद होत आहे की या मोहिमेने १०० कोटी वृक्ष लागवडीचा महत्त्वाचा टप्पा पार केला आहे. 100 कोटी झाडे, तीही अवघ्या पाच महिन्यात, हे केवळ आपल्या देशवासीयांच्या अथक परिश्रमामुळे शक्य झाले आहे. याच्याशी संबंधित आणखी एक गोष्ट ऐकून तुम्हाला अभिमान वाटेल. ‘एक वृक्ष आईच्या नावे’ किंवा ‘एक वृक्ष आईच्या नावाने’ ही मोहीम आता जगातील इतर देशांमध्येही पसरत आहे. मी गयानामध्ये असताना तिथेही या मोहिमेचा मी साक्षीदार होतो. तिथे गयानाचे अध्यक्ष डॉ. इरफान अली, त्यांच्या पत्नीची आई आणि बाकीचे कुटुंब ‘एक वृक्ष आईच्या नावे’ या मोहिमेत माझ्या बरोबर सामिल झाले होते.

मित्रांनो, ही मोहीम देशाच्या विविध भागांमध्ये सातत्याने सुरू आहे. ‘एक पेड माँ के नाम’ या मोहिमे अंतर्गत मध्य प्रदेशातील इंदूरमध्ये वृक्षारोपणाचा विक्रम झाला आहे. येथे 24 तासांत 12 लाखांहून अधिक झाडे लावण्यात आली. या मोहिमेमुळे इंदूरच्या रेवती हिल्सचा ओसाड भाग आता ग्रीन झोनमध्ये बदलून जाणार आहे. राजस्थानमधील जैसलमेरमध्ये या मोहिमेद्वारे एक अनोखा विक्रम रचला गेला.  येथील महिलांच्या टीमने (गटाने) एका तासात 25 हजार झाडे लावली. मातांनी आपल्या आईच्या नावाने झाडे लावली आणि इतरांनाही प्रेरणा दिली. येथे पाच हजारांहून अधिक लोकांनी मिळून एकाच ठिकाणी वृक्षारोपण केले, हा देखील एक विक्रमच आहे. ‘एक पेड माँ के नाम’ किंवा ‘एक वृक्ष आईच्या नावाने’  या मोहिमेअंतर्गत अनेक सामाजिक संस्था स्थानिक गरजांनुसार वृक्षारोपण करत आहेत. जिथे जिथे झाडे लावली जातात तिथे संपूर्ण इको-सिस्टिमचा पर्यावरणपूरक विकास व्हावा, हा त्यांचा प्रयत्न राहिला आहे. त्यामुळे या संस्था काही ठिकाणी औषधी वनस्पती लावत आहेत तर काही ठिकाणी चिमण्या किंवा अन्य पक्ष्यांसाठी घरटी तयार करण्यासाठी झाडे लावत आहेत. बिहारमध्ये ‘जीविका सेल्फ हेल्प ग्रुप’च्या महिला 75 लाख झाडे लावण्याची मोहीम राबवत आहेत. या महिलांचे विशेष लक्ष फळझाडांवर आहे, ज्या झाडांमुळे त्यांना भविष्यात उत्पन्न मिळू शकेल.

मित्रांनो, या मोहिमेत सहभागी होऊन कोणीही व्यक्ती आपल्या आईच्या नावाने एक झाड लावू शकते. जर तुमची आई तुमच्या सोबत असेल तर तुम्ही तिला सोबत घेऊन झाड लावू शकता, अन्यथा तिचा फोटो बरोबर घेऊन जात तुम्ही या मोहिमेचा भाग होऊ शकता. तुम्ही झाडासोबतचा तुमचा सेल्फी mygov.in वर देखील पोस्ट करू शकता. आईने आपल्यासाठी घेतलेल्या कष्टांचे ऋण आपण कधीही फेडू शकत नाही, परंतु तिच्या नावाने एक झाड लावून तिचे अस्तित्व कायम जिवंत ठेवू शकतो.

माझ्या प्रिय देशबांधवांनो, तुम्ही सर्वांनी लहानपणी तुमच्या घराच्या छतावर किंवा झाडांवर चिमण्या चिवचिवाट करताना पाहिल्या असतील. चिमणीला तामिळ आणि मल्याळममध्ये कुरुवी, तेलुगूमध्ये पिचुका आणि कन्नडमध्ये गुब्बी म्हणून ओळखले जाते. प्रत्येक भाषेत आणि संस्कृतीत चिमण्यांच्या कथा सांगितल्या जातात. आपल्या सभोवतालची जैवविविधता टिकवून ठेवण्याच्या कामी चिमण्या अतिशय महत्त्वाची भूमिका बजावतात, परंतु आज शहरांमध्ये चिमण्या क्वचितच दिसतात. वाढत्या शहरीकरणामुळे चिमण्या आपल्यापासून दूर गेल्या आहेत. आजच्या पिढीतील अशी अनेक मुलं आहेत ज्यांनी चिमण्या फक्त चित्रात किंवा व्हिडीओमध्ये पाहिल्या आहेत. अशा मुलांच्या आयुष्यात हा लाडका पक्षी परत आणण्यासाठी काही विशेष प्रयत्न केले जात आहेत. चेन्नईच्या कूदुगल ट्रस्टने चिमण्यांची संख्या वाढवण्याच्या मोहिमेत शाळकरी मुलांना सामावून घेतले आहे. संस्थेतील लोक शाळांमध्ये जाऊन मुलांना चिमणीचे दैनंदिन जीवनात किती महत्त्व आहे हे समजावून सांगतात. या संस्था मुलांना चिमण्यांची घरटी बनवण्याचे प्रशिक्षण देतात. यासाठी संस्थेतील लोकांनी लहान मुलांना लाकडी घरटी बनवायला शिकवले. यामध्ये चिमण्यांची राहण्याची व खाण्याची व्यवस्था करण्यात आली होती. ही घरटी कोणत्याही इमारतीच्या बाहेरील भिंतीवर किंवा झाडावर लावली जाऊ शकतात. या मोहिमेत मुलांनी उत्साहाने भाग घेतला आणि मोठ्या प्रमाणावर चिमण्यांची घरटी बनवायला सुरुवात केली. गेल्या चार वर्षांत संस्थेने चिमण्यांसाठी अशी दहा हजार घरटी तयार केली आहेत. कुदुगल ट्रस्टच्या या उपक्रमामुळे आजूबाजूच्या परिसरात चिमण्यांची संख्या वाढू लागली आहे. तुम्हीही तुमच्या अवतीभवती असे प्रयत्न केले तर चिमण्या पुन्हा आपल्या जीवनाचा एक भाग नक्कीच बनतील.

मित्रांनो, कर्नाटकातील म्हैसूर येथील एका संस्थेने लहान मुलांसाठी ‘अर्ली बर्ड’ नावाची मोहीम सुरू केली आहे. मुलांना पक्ष्यांबद्दलची माहिती सांगण्यासाठी ही संस्था खास प्रकारची लायब्ररी चालवते. एवढेच नाही तर मुलांमध्ये निसर्गाप्रती जबाबदारीची भावना जागृत करण्यासाठी ‘नेचर एज्युकेशन किट’ तयार करण्यात आली आहे. या किटमध्ये मुलांसाठी गोष्टीची पुस्तकं, खेळ, विविध उपक्रम आणि कोडी आहेत. ही संस्था शहरातील मुलांना खेड्यापाड्यात घेऊन जाते आणि त्यांना पक्ष्यांबद्दल सांगते. या संस्थेच्या प्रयत्नांमुळे मुले पक्ष्यांच्या अनेक प्रजाती ओळखू लागल्या आहेत. ‘मन की बात’ ऐकणारी मंडळी सुद्धा त्यांच्या मुलांमध्ये, अशी आजूबाजूला बघण्याची आणि गोष्टी समजून घेण्याची वेगळी पद्धत मुलांमध्ये विकसित करू शकतात.

माझ्या प्रिय देशबांधवांनो, ‘सरकारी कार्यालय’ असं कोणी म्हटल्याबरोबर फायलींच्या ढिगाऱ्याचे चित्र तुमच्या डोळ्यासमोर येत असेल. तुम्ही चित्रपटांमध्येही असंच काहीबाही पाहिलं असेल. सरकारी कार्यालयातील या फायलींच्या ढिगाऱ्यांवर अनेक विनोद केले जातात, अनेक कथा लिहिल्या गेल्या आहेत. झालं असं कि वर्षानुवर्षे या फायली कार्यालयात पडून होत्या, धुळीने भरल्या होत्या, तेथे घाण होऊ लागली होती. अनेक दशके पडून असलेल्या जुन्या फायली आणि भंगार काढण्यासाठी विशेष स्वच्छता मोहीम राबविण्यात आली. तुम्हाला हे ऐकून आनंद होईल की या मोहिमेमुळे सरकारी विभागांमध्ये आश्चर्यकारक परिणाम दिसून आले आहेत. स्वच्छतेमुळे कार्यालयांमध्ये बरीच जागा मोकळी झाली आहे. यामुळे कार्यालयात काम करणाऱ्यांमध्येही आपलेपणाची भावना निर्माण झाली आहे. कामाची जागा स्वच्छ ठेवण्याचे महत्व किंवा गांभीर्यही त्यांना कळून चुकले आहे.

मित्रांनो, जिथे स्वच्छता असते, तिथे लक्ष्मीचा वास असतो, असं तुम्ही आपल्या वाडवडिलांना म्हणताना ऐकलं असेल, ‘कचऱ्यातून कांचन’ ही कल्पना आपल्याकडे खूप जुनी आहे. देशाच्या अनेक भागांत तरुण मंडळी निरुपयोगी समजल्या जाणाऱ्या वस्तूंचा वापर करून टाकाऊ पदार्थातून ‘कांचन’ बनवत आहेत. विविध प्रकारचे नवनवीन उपक्रम राबवत आहेत, शोध लावत आहेत. यातून ते पैसे कमवत आहेत आणि रोजगाराच्या संधी विकसित करत आहेत. हे तरुणही त्यांच्या प्रयत्नातून शाश्वत जीवनशैलीला चालना देत आहेत. मुंबईच्या दोन मुलींचा असा प्रयत्न खरोखरच खूप प्रेरणादायी आहे. अक्षरा आणि प्रकृति नावाच्या या दोन मुली चिंध्यांपासून फॅशन आयटम बनवतात. शिवणकाम करताना कपडे कापताना बाहेर किंवा बाजूला पडणाऱ्या चिंध्या निरुपयोगी समजल्या जातात आणि फेकल्या जातात हेही तुम्हाला माहिती आहे. अक्षरा आणि प्रकृतीची टीम त्याच कपड्यांचा कचरा फॅशन उत्पादनांमध्ये रूपांतरित करते. चिंध्यांपासून बनवलेल्या टोप्या आणि पिशव्याही सहज सहज विकल्या जात आहेत.

मित्रांनो, यूपीच्या कानपूरमध्येही स्वच्छतेबाबत चांगले उपक्रम राबवले जात आहेत. येथे काही लोक रोज सकाळी मॉर्निंग वॉकला जातात आणि गंगेच्या घाटांवर पसरलेला प्लास्टिक आणि इतर कचरा गोळा करतात. या समूहाला ‘कानपूर प्लॉगर्स ग्रुप’ असे नाव देण्यात आले आहे. (प्लॉगिंग म्हणजे जॉगिंग करता करता पिकअप करणे). काही मित्रांनी मिळून ही मोहीम सुरू केली होती. हळूहळू ही लोकसहभागाची मोठी मोहीम बनली. शहरातील अनेक नागरिक त्यात सामील झाले आहेत. त्यांच्या सदस्यांनी आता दुकाने आणि घरातून कचरा गोळा करण्यास सुरुवात केली आहे. या कचऱ्यापासून रिसायकल प्लांटमध्ये ट्री गार्ड तयार केले जातात, म्हणजेच या गटातील लोक कचऱ्यापासून बनवलेल्या ट्री गार्डच्या सहाय्याने झाडांचे संरक्षणही करतात.

मित्रांनो, छोट्या छोट्या प्रयत्नातून किती मोठे यश मिळवता येते याचे उदाहरण म्हणजे आसामची इतिशा. इतिशाचे शिक्षण दिल्ली आणि पुण्यात झाले. कॉर्पोरेट जगतातील आकर्षण बाजूला सारून इतिशा अरुणाचलच्या सांगती खोरे स्वच्छता कामात व्यग्र आहे. पर्यटकांमुळे खोऱ्यात मोठ्या प्रमाणात प्लास्टिकचा कचरा साचू लागला होता. एकेकाळी स्वच्छ असलेली तिथली नदी प्लास्टिक कचऱ्यामुळे प्रदूषित झाली होती. इतिशा स्थानिक लोकांसोबत ते स्वच्छ करण्यासाठी काम करत आहे. त्यांच्या ग्रुपचे लोक तिथे येणाऱ्या पर्यटकांना जागरूक करण्याचे काम करतात आणि प्लास्टिक कचरा गोळा करण्यासाठी संपूर्ण खोऱ्यात बांबूपासून बनवलेले डस्टबिन बसवतात.

मित्रांनो, अशा प्रयत्नांमुळे भारताच्या स्वच्छता मोहिमेला चालना मिळते. ही एक अविरत किंवा अखंड चालणारी मोहीम आहे. तुमच्या आसपासही असं काही निश्चितच घडत असेल. अशा प्रयत्नांबद्दल तुम्ही मला जरूर कळवत रहा.

मित्रांनो, ‘मन की बात’ च्या या एपिसोडमध्ये सध्या एवढेच. मी संपूर्ण महिनाभर तुमच्या प्रतिसादांची, पत्रांची आणि सूचनांची वाट पाहत असतो. दर महिन्याला येणारे तुमचे संदेश मला आणखी किंवा अधिक चांगले काम करण्याची प्रेरणा देत राहतात. तेव्हा, पुढच्या महिन्यात आपण पुन्हा भेटू, ‘मन की बात’ च्या दुसऱ्या अंकात. देश आणि देशवासियांच्या नवीन यशोगाथा किंवा विशेष कामांबद्दलची माहिती घेऊन, तोपर्यंत सर्व देशवासियांना माझ्या शुभेच्छा. खूप खूप धन्यवाद.

मित्रों,
मातृभूमि समाचार का उद्देश्य मीडिया जगत का ऐसा उपकरण बनाना है, जिसके माध्यम से हम व्यवसायिक मीडिया जगत और पत्रकारिता के सिद्धांतों में समन्वय स्थापित कर सकें। इस उद्देश्य की पूर्ति के लिए हमें आपका सहयोग चाहिए है। कृपया इस हेतु हमें दान देकर सहयोग प्रदान करने की कृपा करें। हमें दान करने के लिए निम्न लिंक पर क्लिक करें -- Click Here


* 1 माह के लिए Rs 1000.00 / 1 वर्ष के लिए Rs 10,000.00

Contact us

Check Also

राष्ट्रीय ग्राहक हेल्पलाइनने (NCH) ग्राहकांच्या तक्रारी सोडवण्यासाठी 1000 हून अधिक कंपन्यांसोबत केली भागीदारी

एका महत्त्वपूर्ण घडामोडीनुसार, राष्ट्रीय ग्राहक हेल्पलाइन (NCH) ने तक्रारींचे जलद गतीने निराकरण करण्यासाठी आपल्या अभिसरण कार्यक्रमांतर्गत 1000 हून अधिक …