देशाची सार्वजनिक क्षेत्रातील सर्वात मोठी पोलाद उत्पादक, महारत्न कंपनी भारतीय पोलाद प्राधिकरणाने (सेल) मुंबईतील जागतिक जॉन कॉकरिल ग्रुपची भारतीय शाखा जॉन कॉकरिल इंडिया लिमिटेड (JCIL) सह सामंजस्य करारावर स्वाक्षरी केली.
नवोन्मेष आणि शाश्वतता याबाबतचा समान दृष्टिकोन, व्यापक उद्योग कौशल्य, अद्ययावत तंत्रज्ञान यासह दोन कंपन्यांच्या एकत्रित सामर्थ्याचा लाभ घेणे, हे या सामंजस्य करारामागचे उद्दिष्ट आहे. सेलचे संचालक (वित्त) अनिलकुमार तुलसियानी आणि जॉन कॉकरिल इंडिया लिमिटेडचे धातू विभागाचे व्यवस्थापकीय संचालक मायकेल कोटास यांनी या सामंजस्य करारावर स्वाक्षरी केली.
सहयोगांतर्गत कार्बन स्टील, ग्रीन स्टील आणि सिलिकॉन स्टील – विशेषत: सीआरजीओ (कोल्ड रोल्ड ग्रेन ओरिएंटेड) आणि सीआरएनओ (कोल्ड रोल्ड नॉन-ओरिएंटेड) स्टील्ससाठी कोल्ड रोलिंग आणि प्रोसेसिंग या क्षेत्रांवर लक्ष केंद्रित केले जाईल. याव्यतिरिक्त लोखंड आणि पोलादनिर्मिती प्रक्रियेमध्ये हरित तंत्रज्ञान समाकलित करण्याचा आणि कार्यक्षमता व शाश्वतता वृद्धिंगत करण्यासाठी प्रगत पोलादनिर्मिती तंत्रज्ञान अंतर्भूत करण्याचा प्रयत्न या भागिदारीतून केला जाईल.
प्रगत, शाश्वत तंत्रज्ञानाचा अवलंब करून पारंपरिक लोह आणि पोलादनिर्मिती पद्धतीत परिवर्तन घडवण्यासाठी सेल वचनबद्ध आहे. कार्बन उत्सर्जन कमी करणे आणि संसाधन कार्यक्षमता सुधारणे यावर लक्ष केंद्रित करून गतिशील बाजारपेठेच्या उभरत्या काळाच्या मागणीनुसार सेल आपले परिचालन संरेखित करत आहे आणि हरित, अधिक शाश्वत भविष्यासाठी योगदान देत आहे.