राष्ट्रीय मानवाधिकार आयोगाने (एनएचआरसी) आयोजित केलेल्या दोन आठवड्यांच्या अल्प-मुदतीच्या ऑनलाइन इंटर्नशिप कार्यक्रमाचा समारोप आज झाला. 18 नोव्हेंबर 2024 रोजी या कार्यक्रमाची सुरुवात झाली. देशातील विविध प्रांतातील विविध विद्यापीठांच्या 52 विद्यार्थ्यांनी ही इंटर्नशिप पूर्ण केली.
समारोपाच्या सत्रात एनएचआरसीच्या अध्यक्ष विजया भारती सयानी यांनी मार्गदर्शन केले. इंटर्नशिप यशस्वीरित्या पूर्ण केल्याबद्दल त्यांनी विद्यार्थ्यांचे अभिनंदन केले. प्रत्येक व्यक्तीच्या मानवी हक्कांच्या रक्षणाला चालना देण्यासाठी कार्यक्रमादरम्यान मिळालेल्या नव्या दृष्टीकोनाचा वापर प्रत्येक विद्यार्थी करेल, अशी आशा त्यांनी व्यक्त केली.
अधिक समावेशक आणि न्याय्य समाजाची निर्मिती करण्यासाठी अर्थपूर्ण योगदान देता यावे यासाठी सहभागींनी स्वत:ला मानवाधिकार रक्षक म्हणून विकसित करावे असे आवाहन त्यांनी केले. न्याय, स्वातंत्र्य, समानता आणि बंधुत्वासाठी दृढ वचनबद्धतेबरोबरच सहानुभूती, करुणा अंगी बाणवण्याचे महत्त्व यावर त्यांनी भर दिला.
मानवाधिकारांचे रक्षण करताना विद्यार्थ्यांच्या कृतींमधून त्यांनी मिळवलेल्या ज्ञानाचे प्रतिबिंब उमटले पाहिजे, अशी अपेक्षा एनएचआरसीचे सरचिटणीस भारती लाल यांनी व्यक्त केली. मानवी मूल्ये आत्मसात करणे, बंधुत्व आणि समानतेचे आदर्श ठेवणे तसेत समाजात सकारात्मक बदल घडावा यासाठी सक्रियपणे काम करण्याचे आवाहन लाल यांनी विद्यार्थ्यांना केले.
एनएचआरसीचे सहसचिव देवेंद्र कुमार निम यांनी इंटर्नशिप अहवाल सादर केला. मानवी हक्कांच्या विविध पैलूंवर ज्येष्ठ अधिकारी, तज्ञ आणि प्रतिनिधींनी सत्रे घेतली. मंडोली कारागृह, पोलीस स्टेशन आणि दिल्लीतील आशा किरण निवारा गृह या ठिकाणचे आभासी दौरेदेखील आयोजित करण्यात आले होते. विविध सरकारी संस्थांचे कार्य, मानवी हक्क संरक्षण यंत्रणा, सद्यस्थिती आणि समाजातील असुरक्षित घटकांच्या मानवी हक्कांचे रक्षण करण्यासाठी आवश्यक असलेल्या गोष्टींची माहिती देण्यात आली.
पुस्तक आढावा, समूह संशोधन प्रकल्प सादरीकरण आणि घोषणा स्पर्धेतील विजेत्यांची घोषणा निम यांनी केली. संचालक लेफ्टनंट कर्नल वीरेंद्र सिंग यांनी आभार मानले.