मुंबई, 14 एप्रिल 2026
भारतीय व्यवस्थापन संस्था – आयआयएम नागपूर यांनी महाराष्ट्राच्या पशुसंवर्धन विभागातील 35 वरिष्ठ अधिकाऱ्यांसाठी, शेतकऱ्यांना दिल्या जाणाऱ्या सेवांचा दर्जा सुधारण्याच्या उद्देशाने, आठवडाभराचा प्रशिक्षण कार्यक्रम आयोजित केला.
‘पशुसंवर्धन आणि दुग्धव्यवसाय विभागातील वरिष्ठ अधिकाऱ्यांसाठी धोरणात्मक नेतृत्व’ असे नाव असलेला हा उपक्रम एप्रिल 6 ते 10 दरम्यान आयोजित करण्यात आला. या कार्यक्रमात दुग्धव्यवसाय, कुक्कुटपालन, शेळीपालन आणि डुक्करपालन यांसारख्या महत्त्वाच्या क्षेत्रांमध्ये नियोजन, निर्णयप्रक्रिया आणि व्यावहारिक उपाययोजना सुधारण्यावर भर देण्यात आला.
पशुसंवर्धन आणि दुग्धव्यवसाय विभागाचे सचिव डॉ. एन. रामास्वामी यांनी या कार्यक्रमाचे दूरदृश्य प्रणालीद्वारे उद्घाटन केले आणि क्षेत्रातील जलद वाढ व कृत्रिम रेतन प्रक्रियेत कृत्रिम बुद्धिमत्ता आधारित तंत्रज्ञानाच्या वापराच्या पार्श्वभूमीवर क्षेत्रीय पातळीवरील मजबूत नेतृत्वाची गरज अधोरेखित केली.

हा उपक्रम प्रा. अनुप कुमार, भाप्रसे (निवृत्त) यांच्या नेतृत्वाखाली घेण्यात आला आणि जागतिक बँकेच्या सहाय्याने राबविण्यात येणाऱ्या एमएमएआरटी – स्मार्ट प्रकल्पांतर्गत राज्यातील अधिकाऱ्यांशी सल्लामसलत करून विकसित करण्यात आला. आयआयएम नागपूरचे प्राध्यापक तसेच शैक्षणिक, शासकीय आणि औद्योगिक क्षेत्रातील तज्ज्ञांनी यातील सत्रांमध्ये मार्गदर्शन केले.
सहभागी अधिकारी महाराष्ट्रातील 6 विभागांसाठी प्रदेशनिहाय धोरणात्मक आराखडे तयार करतील, जे धोरणात्मक विचारासाठी सादर केले जातील. पावसाळ्यानंतर आणखी एका गटासाठी अशा प्रकारचा कार्यक्रम आयोजित करण्याची योजना आहे.
Matribhumi Samachar Marathi

