या सहकार्यामुळे केंद्राच्या पायाभूत सुविधांना, शैक्षणिक संशोधनाला आणि गुणवंत विद्यार्थ्यांसाठी शिष्यवृत्तींना पाठबळ मिळणार
नागपूर, ऑक्टोबर 2026 : भारतातील सर्वात मोठ्या खासगी क्षेत्रातील बँकांपैकी एक असलेल्या ॲक्सिस बँक आणि इंडियन इन्स्टिट्यूट ऑफ मॅनेजमेंट बंगळुरू (आयआयएमबी) यांनी सामंजस्य करारावर (MoU) स्वाक्षऱ्या केल्या आहेत. या करारांतर्गत बंगळुरू मधील जिगनी येथे असलेल्या संस्थेच्या नवीन ग्रीनफिल्ड संकुलात, आयआयएमबी – दोराबजी टाटा स्कूल ऑफ अंडरग्रॅज्युएट स्टडीज येथे ॲक्सिस बँक सेंटर ऑफ इकॉनॉमिक्स स्थापन करण्यात येणार आहे.
या सामंजस्य करारावर मुंबईतील वरळी येथील ॲक्सिस हाऊस येथे स्वाक्षऱ्या करण्यात आल्या. या वेळी आयआयएम बंगळुरूच्या संचालक मंडळाचे चेअरपर्सन, डॉ. देवी प्रसाद शेट्टी, ॲक्सिस बँकेचे एमडी & सीईओ, श्री. अमिताभ चौधरी, आयआयएम बंगळुरूचे डायरेक्टर-इन-चार्ज, प्रा. यू. दिनेश कुमार आणि ॲक्सिस बँकेचे होलसेल बँक कव्हरेज, कॉर्पोरेट सॅलरी, सस्टेनेबिलिटी आणि सीएसआर (CSR) विभागाचे ग्रुप हेड, श्री. विजय मुलबागल उपस्थित होते. याशिवाय, दोन्ही संस्थांमधील वरिष्ठ नेतृत्वाचे प्रतिनिधीही या कार्यक्रमाला उपस्थित होते.
या सहकार्याचा एक भाग म्हणून ॲक्सिस बँक नवीन संकुलाच्या पहिल्या टप्प्यातील एकात्मिक शैक्षणिक आणि प्रशासकीय इमारतीमध्ये ॲक्सिस बँक सेंटर ऑफ इकॉनॉमिक्स उभारण्यासाठी आणि ते कार्यान्वित करण्यासाठी सहकार्य करणार आहे. हे केंद्र संपूर्ण स्कूलसाठी एक महत्त्वाचे शैक्षणिक आणि संशोधन केंद्र म्हणून कार्य करेल. या सहकार्यांतर्गत प्राध्यापकांच्या विकासासाठी, संशोधनासाठी तसेच गरज आणि गुणवत्ता या दोन्ही निकषांवर पात्र ठरणाऱ्या विद्यार्थ्यांना शिष्यवृत्ती देण्यासाठीही मदत केली जाणार आहे.
ॲक्सिस बँक सेंटर ऑफ इकॉनॉमिक्स येथे जागतिक मानकांशी सुसंगत असा अभ्यासक्रम राबविण्यात येईल. या अभ्यासक्रमात विषयाचे सखोल ज्ञान, संख्यात्मक पद्धती आणि संगणकीय अध्ययन यांचा सुरुवातीपासूनच समन्वय साधला जाईल. वास्तविक जगातील आर्थिक आव्हानांना सामोरे जाण्यासाठी डेटा, संख्यात्मक पद्धती आणि अनुभवाधारित विश्लेषणाचा वापर करण्यास प्रोत्साहन दिले जाईल. शैक्षणिक उत्कृष्टता, आंतरविद्याशाखीय अध्ययन आणि समकालीन संशोधनासाठी ओळखली जाणारी जागतिक दर्जाची संस्था बनण्याच्या स्कूलच्या ध्येयामध्ये हे केंद्र महत्त्वाची भूमिका बजावेल.
या प्रसंगी बोलताना ॲक्सिस बँकेचे होलसेल बँक कव्हरेज, कॉर्पोरेट सॅलरी, सस्टेनेबिलिटी आणि सीएसआर (CSR) विभागाचे ग्रुप हेड, श्री. विजय मुलबागल म्हणाले, “वाढत्या गुंतागुंतीच्या आर्थिक परिस्थितीशी जुळवून घेण्यासाठी भारताला आवश्यक असलेले ज्ञान, कौशल्ये आणि क्षमता विकसित करण्याच्या दृष्टीने बहुविद्याशाखीय शिक्षण आणि संशोधन अत्यंत महत्त्वाचे आहे. आयआयएम बंगळुरूसोबतच्या सहयोगातून ॲक्सिस बँकेचे उद्दिष्ट पदवीपूर्व शिक्षणात एक नवा आदर्श निर्माण करणे आहे. हा आदर्श जागतिक मानकांशी सुसंगत असेल आणि अर्थपूर्ण अध्यापनपद्धतीची सांगड सखोल संशोधनाशी घालेल. ॲक्सिस बँक सेंटर ऑफ इकॉनॉमिक्समधून भारताच्या दीर्घकालीन, सर्वसमावेशक आणि शाश्वत प्रगतीला दिशा देण्यात अग्रणी भूमिका बजावू शकणाऱ्या संस्थांना बळकटी देण्याप्रती असलेली आमची सातत्यपूर्ण बांधिलकी दिसून येते.”
या प्रसंगी आयआयएमबीचे डायरेक्टर-इन-चार्ज, प्रा. यू. दिनेश कुमार म्हणाले, “आयआयएमबी – दोराबजी टाटा स्कूल ऑफ अंडरग्रॅज्युएट स्टडीज येथे ॲक्सिस बँक सेंटर ऑफ इकॉनॉमिक्स स्थापन करण्याच्या आमच्या दृष्टिकोनाला पाठिंबा दिल्याबद्दल आम्ही ॲक्सिस बँकेचे आभारी आहोत. व्यवसाय, बाजारपेठा आणि समाजाला आकार देणाऱ्या शक्ती समजून घेण्यासाठी अर्थशास्त्र हा एक मध्यवर्ती विषय आहे. आज अर्थशास्त्राच्या अध्ययनासाठी संख्यात्मक आणि गुणात्मक पद्धतींचा भक्कम पाया, डेटावर आधारित उपयोजन आणि आंतरविद्याशाखीय विचारसरणी यांची वाढत्या प्रमाणात आवश्यकता भासत आहे. जागतिक आणि राष्ट्रीय विकासाला चालना देणाऱ्या घटकांचा सखोल अभ्यास करण्यासाठी विद्यार्थी आणि प्राध्यापकांना पोषक वातावरण निर्माण करण्यात हे केंद्र योगदान देईल. ॲक्सिस बँकेच्या पाठिंब्यामुळे आम्हाला शैक्षणिक पायाभूत सुविधा अधिक बळकट करता येतील आणि जागतिक दर्जाची पदवीपूर्व शिक्षणसंस्था विकसित करण्याच्या स्कूलच्या ध्येयाला पुढे नेणाऱ्या संधी निर्माण करता येतील.”
आयआयएमबी – दोराबजी टाटा स्कूल ऑफ अंडरग्रॅज्युएट स्टडीजने ऑगस्ट 2026 मध्ये आपल्या पहिल्या शैक्षणिक तुकडीचे स्वागत केले. डेटा सायन्सेस आणि अर्थशास्त्र या विषयांतील विज्ञान पदवी (ऑनर्स) अभ्यासक्रमांसाठीच्या जवळपास 12,000 अर्जदारांमधून कठोर आणि सखोल निवड प्रक्रियेद्वारे 80 विद्यार्थ्यांची निवड करण्यात आली. पहिल्या शैक्षणिक तुकडीतील 40 विद्यार्थी ॲक्सिस बँक सेंटर ऑफ इकॉनॉमिक्स येथे अर्थशास्त्र विषयातील विज्ञान पदवी अभ्यासक्रम पूर्ण करतील आणि त्यासोबत डेटा सायन्सेस हा उपविषय निवडतील.
स्कूलच्या भक्कम शैक्षणिक पायावर आधारित ॲक्सिस बँक सेंटर ऑफ इकॉनॉमिक्स विद्यार्थी आणि प्राध्यापकांसाठी नवीन संधींची दालने खुली करेल. त्याचबरोबर, भारताच्या विकासाला दिशा देण्यासाठी आणि जागतिक अर्थव्यवस्थेशी प्रभावीपणे जोडले जाण्यासाठी आवश्यक क्षमता असलेले भावी अर्थतज्ज्ञ, संशोधक आणि नेतृत्व घडविण्यास हातभार लावेल.
Featured Article
Matribhumi Samachar Marathi

