रशियन कृषी मंत्रालयाचे उपमंत्री मॅक्सिम टिटोव्ह यांच्या नेतृत्वाखालील शिष्टमंडळाने 11 नोव्हेंबर 2024 रोजी ग्राहक व्यवहार विभागाच्या सचिव निधी खरे यांची भेट घेतली आणि डाळी तसेच कडधान्याच्या व्यापाराच्या क्षेत्रात सहकार्य वाढवण्याच्या उपाययोजनांवर चर्चा केली. अलीकडच्या काळात रशिया हा भारताच्या मसूर आणि पिवळ्या- पांढ-या वाटाण्याच्या आयातीचा प्रमुख स्रोत म्हणून उदयाला आला आहे. या दोन डाळींव्यतिरिक्त, रशिया आपल्या डाळींच्या उत्पादनात उडीद आणि तूर यांसारखी विविधता आणण्याचा विचार करत आहे. खरीपाचे पिक चांगले होईल, अशी शक्यता असल्यामुळे आणि सातत्याने होणाऱ्या आयातीमुळे जुलै 2024 पासून तूर, उडीद आणि चणे यांसारख्या प्रमुख डाळी आणि कडधान्यांच्या पुरवठ्यात निरंतर परंतु लक्षणीय सुधारणा झाली आहे. तुरीचे उत्पादन चांगले झाल्याचे वृत्त आहे आणि कर्नाटकच्या काही भागांमध्ये तुरीचा सुगीचा हंगाम लवकर सुरू झाला आहे. या वर्षी तूर, उडीद, चणे आणि सफेद वाटाण्याच्या आयातीचा ओघ भक्कम असल्याने डाळी आणि कडधान्ये एकंदरच पुरेशा प्रमाणात उपलब्ध आहेत. 2024 या कॅलेंडर वर्षात तूर आणि उडीद यांची नोव्हेंबरच्या पहिल्या आठवड्यात अनुक्रमे 10 लाख मेट्रिक टन आणि 6.40 लाख मेट्रिक टन आयात झाली असून गेल्या वर्षीच्या संपूर्ण वर्षाच्या आयातीपेक्षा ती जास्त आहे.
ऑस्ट्रेलियातून आयात केलेला चण्याचा मोठा साठा नोव्हेंबर महिन्यात पोहोचेल अशी अपेक्षा आहे. डाळी आणि कडधान्यांच्या आयातीसाठी अलीकडेच पुरवठादार देशांमध्ये विविधता आणल्यामुळे वाढत्या स्पर्धात्मक दरात निरंतर आयात सुरू ठेवण्यामध्ये महत्त्वाची भूमिका बजावली आहे. गेल्या दोन-तीन दिवसात विशिष्ट बाजारपेठांमध्ये टंचाई आढळल्याने सणासुदीचा हंगाम आणि बाजारांची सुटी विचारात घेऊन सरकारने कांद्याचा साठा वाढवण्याचा निर्णय घेतला. कृषी आणि शेतकरी कल्याण विभागाच्या मूल्यांकनानुसार, या वर्षी खरीपाच्या लागवडीचे क्षेत्र 3.82 लाख हेक्टर होते जे गेल्या वर्षीच्या 2.85 लाख हेक्टरपेक्षा 34% नी जास्त आहे. नोव्हेंबरच्या पहिल्या आठवड्यापर्यंत 1.28 लाख हेक्टर व्याप्तीसह उशिराच्या खरीप कांद्याची पेरणीची प्रगती देखील सामान्य असल्याचे मानले जात आहे. सरकारने या वर्षी भाव स्थिर ठेवण्याच्या उद्देशाने अतिरिक्त साठा राखण्यासाठी 4.7 लाख टन रब्बी कांदा खरेदी केला होता आणि 5 सप्टेंबर 2024 पासून किरकोळ विक्रीद्वारे 35 रुपये प्रति किलो दराने वितरण सुरू केले आणि देशभरातील प्रमुख मंडयांमध्येही मोठ्या प्रमाणात विक्री सुरू केली होती. आतापर्यंत नाशिक आणि इतर कांदा उत्पादक आणि पुरवठादार स्रोत केंद्राकडून 1.50 लाख टन कांद्याचा साठा ट्रकद्वारे पाठवण्यात आला आहे. यापूर्वी, कांदा एक्स्प्रेसने 1,600 मेट्रिक टन कांदा पाठवण्यात आला होता आणि हा साठा 20 ऑक्टोबर 2024 रोजी दिल्लीच्या किशनगंज स्थानकावर दाखल झाला होता तसेच 30 ऑक्टोबर 2024 रोजी 840 मेट्रिक टन कांद्याची दुसरी खेप रेल्वे रेकने दिल्लीला दाखल झाली होती. काद्यांचा मोठा साठा चेन्नई आणि गुवाहाटी येथे देखील यापूर्वी पाठवला होता. 23 ऑक्टोबर 2024 रोजी नाशिकहून रेल्वे रेकने 840 एमटी कांदा चेन्नईला पाठवण्यात आला होता, जो तिथे 26 ऑक्टोबरला दाखल झाला. 840 एमटी इतका कांद्याचा साठा गुवाहाटीमधील चांगसरी स्थानकात 5 नोव्हेंबर 2024 रोजी दाखल झाला जो आसाम, मेघालय, त्रिपुरा आणि इतर ईशान्य राज्यांमधून पाठवला होता.
बाजारपेठांमध्ये भाव कोसळल्याने टोमॅटोच्या किरकोळ दरात घट झाली आहे. आझादपूर मंडीमध्ये सरासरी साप्ताहिक दरात 27 टक्के घसरण होऊन दर 4000 रुपये प्रतिक्विंटल झाला तर पिंपळगावमध्ये साप्ताहिक दरात 35 टक्के घसरण होऊन भाव 2250 रुपये प्रतिक्विंटल झाला. गेल्या तीन महिन्यात बटाट्याचे किरकोळ दर प्रतिकिलो 37 रुपये इतके राहिल्याने अखिल भारतीय सरासरी स्थिर राहिली आहे.