देशातील 22,000 न्यायालये ई-न्यायालय प्रणालीशी जोडण्यात आली असून ई-तुरुंग अंतर्गत दोन कोटींहून अधिक कैद्यांची माहिती उपलब्ध केंद्रीय गृह आणि सहकार मंत्री अमित शाह यांनी आज गुजरातमध्ये गांधीनगर येथे 50 व्या अखिल भारतीय पोलीस विज्ञान परिषदेला मुख्य अतिथी म्हणून संबोधित केले.
उपस्थितांशी संवाद साधताना, पोलीस विज्ञान परिषद, गुन्ह्यांविरोधातील लढाईत आपल्या संपूर्ण यंत्रणेला काळानुरूप समर्पक ठेवण्याचे कार्य करते ही बाब केंद्रीय गृहमंत्र्यांनी ठळकपणे मांडली. पोलीस दलाची रचना, सहभाग, माहिती गोळा करण्याच्या पद्धती तसेच संशोधन आणि विकास प्रणालीचे लाभ पोलीस ठाण्यांतील बीट शिपायाच्या पातळीपर्यंत पोहोचवण्याची यंत्रणा या सगळ्यांच्या संदर्भात नव्याने काम करण्याची गरज आहे यावर शाह यांनी अधिक भर दिला.या सर्व पैलूंचे व्यापकपणे पुनर्मुल्यांकन करण्याची वेळ आली आहे असे ते पुढे म्हणाले.
कोणतीही यंत्रणा 50 वर्षांपर्यंत बदलाविना तशीच राहिली तर ती कालबाह्य होऊन जाते असे केंद्रीय गृहमंत्री म्हणाले. गेल्या काही दशकांमध्ये आपला देश, जग, गुन्ह्यांचे स्वरूप आणि तपासाची पद्धत यामध्ये लक्षणीय बदल घडून आले आहेत याकडे त्यांनी निर्देश केला.भविष्यात सामोरी येणारी आव्हाने समजून घेतल्याशिवाय आपले नियोजन यशस्वी होऊ शकत नाही असे देखील केंद्रीय मंत्री शाह म्हणाले.
या परिषदेत आयोजित आठ सत्रांमध्ये नवे गुन्हेगारी कायदे, न्यायवैद्यक शास्त्राचा वापर, आपत्ती व्यवस्थापन, ब्लॉक-चेन तंत्रज्ञानाचा वापर, सायबर घोटाळे, स्मार्ट शहरांमधील पोलिसिंग, आदिवासी भागांमध्ये समुदाय पोलिसिंग तसेच तुरुंगांमधील मूलगामीकरणाच्या समस्येवरील उपाययोजना यांसारख्या विषयांवर विचारविनिमय करण्यात येईल अशी माहिती त्यांनी दिली. केंद्रीय गृहमंत्री म्हणाले की पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या अध्यक्षतेखाली भारतातील अंतर्गत सुरक्षा आणि देशाच्या गुन्हेविषयक न्यायदान यंत्रणेत आमुलाग्र बदल घडून आले आहेत. येत्या 10 वर्षांमध्ये भारताची गुन्हेविषयक न्यायदान यंत्रणा जगातील सर्वात आधुनिक, वैज्ञानिक आणि वेगवान यंत्रणा असेल असा विश्वास त्यांनी व्यक्त केला.
गेल्या दशकाच्या आधीच्या दशकाशी तुलना करता गेल्या 10 वर्षांत आपण हिंसाचार 70%नी कमी करण्यात यशस्वी झालो आहोत याचा उल्लेख त्यांनी केला.
केंद्रीय गृहमंत्री म्हणाले की संगणकीकरण हे नव्या गुन्हेगारी प्रतिबंधक कायद्यांच्या अंमलबजावणीतील पहिले पाऊल होते. देशातील 100 % पोलीस ठाणी म्हणजेच सर्वच्या सर्व, 17,000पोलीस ठाण्यांचे संगणकीकरण झाले असून ही ठाणी गुन्हे आणि गुन्हेगारी ट्रॅकिंग नेटवर्क आणि यंत्रणा (सीसीटीएनएस) शी जोडलेली आहेत अशी माहिती त्यांनी दिली.
केंद्रीय गृहमंत्री म्हणाले की विविध मार्गांनी संकलित माहिती एकत्र करून कृत्रिम बुद्धिमत्तेच्या (एआय) माध्यमातून तिचा सामूहिकरीत्या वापर करण्याच्या दिशेने प्रयत्न झाले पाहिजेत.
केंद्रीय मंत्री शाह म्हणाले की अशी पाच क्षेत्रे आहेत ज्यामध्ये कायदा अंमलबजावणी यंत्रणांनी नेहमीच गुन्हेगारांच्या पुढे असले पाहिजे. सायबर गुन्ह्यांची सोडवणूक, तंत्रज्ञानाचा वापर करून घुसखोरी रोखणे आणि सीमांचे संरक्षण करणे, ड्रोन्सचा बेकायदेशीर वापर थांबवणे, अंमली पदार्थ विषयक प्रकरणांची चौकशी आणि जागरूकता यामध्ये आधुनिक तंत्रज्ञानाचा अधिकाधिक वापर करणे आणि डार्क वेब च्या गैरवापराला आळा घालणे ही ती पाच क्षेत्रे आहेत असे अमित शाह म्हणाले.