पंतप्रधानांच्या प्रतिसादात्मक आणि कार्यक्षम प्रशासनाच्या दृष्टीकोनानुसार, प्रशासकीय सुधारणा आणि सार्वजनिक तक्रार विभागाने (DARPG) 18 नोव्हेंबर 2024 रोजी नवी दिल्लीतील विज्ञान भवन येथे “सार्वजनिक तक्रारींचे प्रभावी निवारण” या विषयावर राष्ट्रीय कार्यशाळेचे आयोजन केले होते.
कार्मिक, सार्वजनिक तक्रारी आणि निवृत्तीवेतन राज्यमंत्री डॉ जितेंद्र सिंह यांनी या कार्यक्रमात मुख्य भाषण केले. सरकारच्या सततच्या प्रयत्नांमुळे, केंद्रीय सचिवालयातील तक्रारींचे निराकरण करण्याचा कालावधी आता फक्त 13 दिवसांवर आला आहे, हे डॉ. सिंह यांनी अधोरेखित केले. ही बाब, पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वाखाली नागरिक-केंद्रित प्रशासनासाठी सरकारची बांधिलकी दर्शवते, असे ते म्हणाले. त्यांनी सेंट्रलाइज्ड पब्लिक ग्रीव्हन्स रिड्रेस अँड मॉनिटरिंग सिस्टीम (CPGRAMS) अर्थात केंद्रीय कृत सार्वजनिक तक्रार निवारण आणि देखरेख प्रणालीमधील परिवर्तनात्मक सुधारणांवर भर दिला. या प्रणालीने केवळ ऑक्टोबर 2024 या महिन्यात 116,000 तक्रारी हाताळल्या आहेत, असे त्यांनी सांगितले. केंद्रीय सचिवालयातील CPGRAMS च्या प्रलंबित तक्रारींची संख्या ऑक्टोबर, 2024 मध्ये 53,897 च्या विक्रमी नीचांकी पातळीवर आल्याचे त्यांनी नमूद केले. हा सलग 28 वा महिना होता जिथे केंद्रीय सचिवालयात मासिक तक्रारींचे निराकरण दरमहा 100,000 पेक्षा जास्त होण्याचा हा सलग 28 वा महिना असल्याचेही त्यांनी सांगितले.
तक्रार हाताळणी अधिक कार्यक्षम आणि नागरिकांसाठी अनुकूल बनवण्याच्या उद्देशाने CPGRAMS चे आधुनिकीकरण करण्यासाठी कृत्रिम बुद्धिमत्ता आणि मशीन लर्निंग-चालित सुधारणांच्या वापराची मंत्र्यांनी प्रशंसा केली. डॉ. सिंह यांनी सरकारी सेवेच्या गुणवत्तेचे बॅरोमीटर म्हणून सार्वजनिक तक्रारींच्या महत्त्वावर भर दिला. केवळ तक्रारींचे कार्यक्षमतेने निराकरण करण्यासाठीच नव्हे तर तक्रार निर्माण करणाऱ्या घटनांना प्रतिबंध करण्यासाठी पद्धतशीर सुधारणांची अंमलबजावणी करण्याच्या सरकारच्या ध्येयाची त्यांनी पुष्टी केली.
कार्यशाळेत केंद्रीय मंत्रालये, राज्य सरकारे आणि राज्य प्रशासकीय प्रशिक्षण संस्था (एटीआय) यांच्या प्रतिनिधींसह 500 हून अधिक अधिकाऱ्यांनी उत्साहपूर्ण सहभाग घेतला. पाच सत्रांची व्याप्ती आणि 22 सादरीकरणे असलेल्या कार्यशाळेने नाविन्यपूर्ण पद्धतींचा विचार करण्यासाठी, धोरणांच्या अनुपालनाचे पुनरावलोकन करण्यासाठी आणि भारतातील तक्रार निवारणासाठी भविष्यातील दिशानिर्देश तयार करण्यासाठी एक व्यासपीठ म्हणून काम केले.
या कार्यक्रमात तक्रार निवारण मूल्यमापन आणि निर्देशांक (GRAI) 2023 चे प्रकाशन देखील झाले. यात सर्वोत्तम कामगिरी करणारी मंत्रालये आणि विभागांचा गौरव करण्यात आला. याव्यतिरिक्त, नवीन CPGRAMS मोबाइल ॲप 2.0 लाँच करण्यात आले. हे ॲप नागरिकांसाठी तक्रार दाखल करणे आणि तक्रार निवारणाची देखरेख सुलभ करण्यासाठी आरेखित केलेले आहे. हे ॲप सध्या गुगल प्ले स्टोअरवर उपलब्ध असून लवकरच iOS व्यासपीठावरही उपलब्ध होईल.
समापन सत्रात, प्रशासकीय सुधारणा आणि सार्वजनिक तक्रार विभागाचे सचिव व्ही. श्रीनिवास यांनी चर्चेचा सारांश सादर केला आणि प्रशासन स्तरांवर सर्वोत्तम पद्धतींची देवाणघेवाण सुलभ करण्याच्या विभागाच्या संकल्पाचा पुनरुच्चार केला. बहुतेक मंत्रालये आणि विभागांनी 23.8.2024 चे प्रशासकीय सुधारणा आणि सार्वजनिक तक्रार विभागाचे 21 दिवसांत वेळेवर तक्रार निवारण आणि समर्पित तक्रार कक्षाची स्थापना सुनिश्चित करण्याबाबतचे परिपत्रक स्वीकारले आहे, असेही ते म्हणाले. या कार्यशाळेने उत्तरदायी आणि पारदर्शक प्रशासनाच्या दृष्टीकोनाशी संरेखित अशा सक्षम आणि नागरिक-केंद्रित तक्रार निवारणासाठी सरकारच्या वचनबद्धतेला बळकटी दिली.