ब्राझीलमधील रिओ दि जानेरो येथे जी-20 शिखर परिषदेच्या पार्श्वभूमीवर पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी इंडोनेशियाचे नवनिर्वाचित राष्ट्राध्यक्ष एचई प्रबोवो सुबियांटो यांची आज भेट घेतली. दोन्ही नेत्यांची ही पहिलीच भेट होती.
राष्ट्राध्यक्ष सुबियांटो यांनी पदभार स्वीकारल्याबद्दल पंतप्रधानांनी त्यांचे अभिनंदन केले. दोन्ही नेत्यांनी त्यांच्या सर्वसमावेशक धोरणात्मक भागीदारीच्या चौकटीत द्विपक्षीय संबंध मजबूत करण्याच्या आपल्या वचनबद्धतेला दुजोरा दिला.त्यांनी व्यापार आणि गुंतवणूक, संरक्षण आणि सुरक्षा, दळणवळण, पर्यटन, आरोग्य आणि लोकांचे आपापसातील संबंध या क्षेत्रातील सहकार्यावर चर्चा केली. यंदाच्या वर्षी भारत आणि इंडोनेशिया राजनैतिक संबंधांच्या स्थापनेची 75 वर्षे पूर्ण होत आहेत आणि या आनंददायी प्रवासाचा सोहळा समुचित प्रकारे साजरा करण्याचे आवाहन दोन्ही नेत्यांनी यावेळी केले.
जागतिक आणि प्रादेशिक विषयांवरही नेत्यांनी यावेळी चर्चा केली.G 20 मध्ये त्यांच्या वाढत्या सहकार्यावर चर्चा करून, त्यांनी दक्षिण आशियाई देशांच्या चिंतांना प्राधान्य देण्याचे आवाहन केले.त्यांनी आसियानसह बहुपक्षीय आणि बहुविध क्षेत्रांमध्ये सुरू असलेल्या सहकार्याचाही त्यांनी या भेटीदरम्यान आढावा घेतला.