लाओ पीडीआरमधील व्हिएन्टिन इथे होत असलेल्या 11 व्या आसिआन संरक्षण मंत्रीस्तरीय बैठकीदरम्यान (एडीएमएम – प्लस) संरक्षण मंत्री राजनाथ सिंह यांनी आज 21 नोव्हेंबर 2024 रोजी अमेरिकेचे संरक्षण मंत्री लॉइड जे. ऑस्टीन यांची भेट घेतली. भारत अमेरिका यांच्यात संरक्षण क्षेत्रातील प्रत्यक्ष सहकार्य, माहितीचे आदानप्रदान व औद्योगिक नवोन्मेष या आधारे दोन्ही देशांनी संरक्षण भागीदारीमध्ये केलेली प्रगती याबाबत दोन्ही नेत्यांनी प्रशंसा केली. भारत अमेरिका संरक्षण औद्योगिक सहकार्याबातच्या पथदर्शी आराखड्याअंतर्गत केलेल्या उल्लेखनीय प्रगतीचीही दोन्ही देशांनी आवर्जून दखल घेतली. यामध्ये सध्याच्या सहकार्य क्षेत्राबरोबरच जेट इंजिन, युद्धसामुग्री व रस्ते वाहतूक यंत्रणा यामधील उत्पादन सहकार्य वाढविण्यास प्राधान्य देणाऱ्या उपाययोजनांचा समावेश आहे.
‘एक्स’ वरील संदेशात राजनाथ सिंह यांनी अमेरिकेचे संरक्षण मंत्री लॉइड ऑस्टीन भारताचे चांगले मित्र असल्याचे म्हटले आहे. भारत अमेरिका यांच्यातील संरक्षण क्षेत्रातील भागीदारी मजबूत होण्यात त्यांचे योगदान महत्त्वाचे आहे, असे राजनाथ सिंह म्हणाले. राजनाथ सिंह यांनी ऑस्टीन यांना भविष्यातील उपक्रमांसाठी शुभेच्छा दिल्या आहेत.