Saturday, September 12 2026 | 12:09:58 AM
Breaking News

मिसिंग लिंक ट्रस्टकडून बालसुरक्षेबाबत पालक आणि काळजीवाहकांना सक्षम करण्यासाठी ‘खुली बात’ची सुरुवात

Connect us on:

मुंबईतील पूर्व विभागातील महानगरपालिकेच्या 100 शाळांमध्ये एआय-सक्षम व्हॉट्सॲप चॅटबॉटच्या माध्यमातून मदत उपलब्ध करून देण्याची मिसिंग लिंक ट्रस्टची योजना

मुंबई, सितंबर 2026: बालसुरक्षेची सुरुवात संवादातून होते. एनसीआरबीच्या ‘क्राइम इन इंडिया 2024’ या अहवालानुसार, भारतात लैंगिक गुन्ह्यांपासून बालकांचे संरक्षण (पॉक्सो) कायद्यांतर्गत 69,191 प्रकरणांची नोंद झाली. यांपैकी 96%हून अधिक प्रकरणांमध्ये अनोळखी व्यक्तींऐवजी मुलांच्या जवळच्या परिचयातील व्यक्ती जबाबदार होत्या. मुलांना आणि तरुणांना वैयक्तिक मर्यादा, संमती आणि चांगले व सुरक्षित नातेसंबंध समजावून सांगणे, त्यांना अस्वस्थ करणाऱ्या परिस्थिती ओळखता येणे तसेच मदत कधी आणि कशी मागायची हे माहीत असणे, या बाबी अत्याचार रोखण्यासाठी महत्त्वाच्या आहेत. त्याचप्रमाणे मुलांचे म्हणणे ऐकून घेण्यासाठी, योग्य प्रतिसाद देण्यासाठी आणि त्यांना आधार देण्यासाठी आवश्यक माहिती पालक, शिक्षक आणि काळजीवाहकांना असणेही तितकेच महत्त्वाचे आहे.

अत्याचार रोखण्याला प्राधान्य देणारा हा दृष्टिकोन पुढे नेत मिसिंग लिंक ट्रस्टने (एमएलटी) आज कॅपजेमिनी इंडियाच्या सहकार्याने ‘खुली बात’हा एआय-सक्षम आणि व्हॉट्सॲपवर आधारित बालसुरक्षा चॅटबॉट सादर केला.

‘खुली बात’ म्हणजे मोकळेपणाने केलेला संवाद. पालक व काळजीवाहकांना बालसुरक्षेबाबत विश्वसनीय माहिती आणि मार्गदर्शन अधिक सहज उपलब्ध करून देण्यासाठी हा चॅटबॉट तयार करण्यात आला आहे. आपल्या देखरेखीखाली असलेल्या मुलांशी वैयक्तिक मर्यादा, संमती, नातेसंबंध, ऑनलाइन सुरक्षा, अत्याचार आणि शोषण यांविषयी संवाद कसा साधायचा, याबाबत प्रौढांना या चॅटबॉटच्या माध्यमातून मदत मिळते. तसेच गरज भासल्यास योग्य मदत आणि आवश्यक साधनांची माहितीही यातून देण्यात येते. कोणत्याही प्रौढ व्यक्तीला व्हॉट्सॲपवर 6003060040 या क्रमांकावर ‘Hi’ असा मेसेज पाठवून या चॅटबॉटशी संवाद सुरू करता येतो.

महाराष्ट्र सरकारच्या माहिती व जनसंपर्क विभागाचे प्रधान सचिव श्री. ब्रिजेश सिंह, आयपीएस आणि इतर मान्यवरांच्या हस्ते या चॅटबॉटचे अनावरण करण्यात आले. मुंबईतील महानगरपालिकेच्या 100 शाळांमध्ये बालकांवरील अत्याचार रोखण्यासाठी मिसिंग लिंक ट्रस्ट काम करत आहे. या भागीदारीअंतर्गत तीन क्षेत्रांमध्ये काम करण्यात येत आहे. शाळांमधील कार्यक्रमांच्या माध्यमातून 10,000 किशोरवयीन मुला-मुलींना सुरक्षाविषयक शिक्षण देणे, पालक, शिक्षक आणि काळजीवाहूंसाठी एआय-सक्षम सुरक्षा चॅटबॉट म्हणून ‘खुली बात’ विकसित करणे आणि विविध संबंधित घटकांच्या परिषदा व चर्चांच्या माध्यमातून बालकांवरील लैंगिक अत्याचारांना प्रतिबंध करण्यासाठी आणि त्यावर योग्य प्रतिसाद देण्यासाठीची व्यवस्था अधिक सक्षम करणे यांचा त्यात समावेश आहे.

मिसिंग लिंक ट्रस्टच्या संस्थापक विश्वस्त आणि सीईओ लीना केजरीवाल म्हणाल्या, “’खुली बात’मध्ये एआय मॉडेलच्या माध्यमातून केवळ सर्वसाधारण स्वरूपाचा सल्ला देण्यात येत नाही. गेल्या 10हून अधिक वर्षांपासून आम्ही प्रत्यक्ष क्षेत्रात केलेल्या कामाच्या अनुभवाच्या आधारे हा चॅटबॉट तयार करण्यात आला आहे. त्यामुळे त्यातून मिळणारे मार्गदर्शन स्थानिक पातळीवरील प्रत्यक्ष जोखमींच्या स्वरूपावर आधारित असून भारतीय कुटुंबांना ज्या वास्तवाचा सामना करावा लागतो, त्याचाही संवेदनशीलपणे विचार करण्यात आला आहे. प्रत्येक उत्तर काळजीपूर्वक तयार करण्यात आलेल्या माहितीच्या संग्रहावर आधारित आहे. ही माहिती संकलित करताना पूर्वग्रह, लिंगभाव आणि सत्तासंबंध यांचा जाणीवपूर्वक विचार करण्यात आला आहे. तसेच डिजिटल ॲक्सेस व साक्षरतेच्या विविध टप्प्यांवर असलेल्या प्रौढांनाही तो वापरता येईल, अशा प्रकारे या चॅटबॉटची रचना करण्यात आली आहे. केवळ माहिती देण्यापुरते हे मर्यादित नाही. गरज भासल्यास कुटुंबांना त्यांच्या परिसरातील प्रत्यक्ष मदत आणि तक्रार नोंदवण्याच्या योग्य मार्गांशीही जोडण्यात येते. त्यामुळे प्रौढांना केवळ माहिती देणे हा यामागचा उद्देश नाही, तर त्यांच्या समोर घडत असलेली परिस्थिती समजून घेण्यास आणि त्यानुसार योग्य पाऊल उचलण्यास त्यांना मदत करणे हा उद्देश आहे.”

कॅपजेमिनी इंडियाचे व्हाइस प्रेसिडेंट आणि सीएसआर हेड कुमार अनुराग प्रताप म्हणाले, “मुले ऑनलाइन अधिक वेळ घालवत असल्यामुळे तंत्रज्ञानासोबत नव्या संधींबरोबरच नव्या प्रकारच्या जोखमीही निर्माण होत आहेत. त्यामुळे अशा घटना रोखणे आणि संभाव्य धोके लवकर ओळखून योग्य पावले उचलणे अधिक महत्त्वाचे ठरत आहे. पालक आणि काळजीवाहू आधीपासून वापरत असलेल्या प्लॅटफॉर्मच्या माध्यमातून बालसुरक्षेविषयी विश्वसनीय माहिती आणि साधने त्यांना सहज उपलब्ध करून देण्यासाठी ‘खुली बात’मध्ये तंत्रज्ञानाचा वापर करण्यात आला आहे.”

मिसिंग लिंक ट्रस्टच्या मिसिंग अवेअरनेस अँड स्कूल सेफ्टी प्रोग्राम (एमएएसएसपी) या व्यापक प्रतिबंधात्मक उपक्रमाच्या पुढील टप्प्याच्या रूपात ‘खुली बात’ची सुरुवात करण्यात आली आहे. या उपक्रमाच्या माध्यमातून किशोरवयीन मुला-मुलींना बालकांवरील लैंगिक अत्याचार, ऑनलाइन सुरक्षा, वैयक्तिक मर्यादा, विश्वास संपादन करून गैरफायदा घेण्याचे प्रकार, अत्याचाराबद्दल सांगणे आणि मदत मागणे यांविषयी आवश्यक माहिती आणि कौशल्ये प्रदान करण्यात येतात.

‘खुली बात’च्या माध्यमातून ही व्यवस्था अधिक सक्षम करण्याचे आणि सुरक्षाविषयक शिक्षण, मोकळेपणाने संवाद साधणे आणि गरज भासल्यास लवकर मदत मागणे या गोष्टी बालपणातील दैनंदिन जीवनाचा भाग करण्याचे एमएलटीचे उद्दिष्ट आहे.

Featured Article

About Matribhumi Samachar

Check Also

स्टॅकूचे मुंबईत पदार्पण, प्रीमियम स्टेशनरी आणि लाइफस्टाइल रिटेलला नवीन आकार दिला

लिंक लिमिटेडच्या अनुभवात्मक रिटेल संकल्पनेचे स्काय सिटी मॉल येथे दुसरे स्टोअर सुरू मुंबई, सप्टेंबर २०२६: …