“आज ऊर्जा ही आर्थिक वाढ आणि प्रगतीचा कणा बनली आहे,” असे प्रतिपादन पेट्रोलियम आणि नैसर्गिक वायू मंत्री हरदीप सिंह पुरी यांनी आज ग्रेटर नोएडा येथे भारतातील महत्वपूर्ण दक्षिण आशियाई भूविज्ञान परिषद आणि प्रदर्शन जियो इंडिया 2024 (GEO India 2024) याच्या उद्घाटन समारंभात केले.भारतासारख्या देशात, जेथे वाढत्या अर्थव्यवस्थेच्या अनुषंगाने ऊर्जेची मागणी वेगाने वाढत आहे, तेथे आर्थिक प्रगतीसाठी ऊर्जेचे योगदान महत्त्वपूर्ण असल्याचे पुरी यांनी आपल्या बीज भाषणात अधोरेखित केले.
भारत आणि परदेशातील अन्वेषण आणि निर्मिती क्षेत्रातील आघाडीच्या तज्ञांना एकत्र आणणाऱ्या या कार्यक्रमात सहभागी झाल्याबद्दल मंत्री महोदयांनी आनंद व्यक्त केला.
ऊर्जा क्षेत्रातील घडामोडींच्या नव्या परिमाणांचा शोध ही संकल्पना असलेल्या असोसिएशन ऑफ पेट्रोलियम जिओलॉजिस्ट, आयोजित जियो इंडिया 2024 ही अशा प्रकारची सहावी परिषद आहे.
भारतातील इंधनाची मागणी जागतिक सरासरीच्या तिप्पट वाढली असून,भारतात दररोज 67 दशलक्ष लोक पेट्रोल पंपांना भेट देतात, असे पुरी यांनी यावेळी नमूद केले.या वाढत्या मागणीमुळे पुढील दोन दशकांत ऊर्जेच्या वापरातील जागतिक वाढीपैकी 25% वाढ ही भारतात होण्याची अपेक्षा आहे.
पुरी यांनी भारताच्या ऊर्जा भविष्याबद्दल,विशेषतः हरित हायड्रोजनच्या क्षेत्रात आशावाद व्यक्त केला.नैसर्गिक वायू पाइपलाइनमध्ये हायड्रोजनचे मिश्रण, इलेक्ट्रोलायझर तंत्रज्ञानाचे स्थानिकीकरण आणि हरित हायड्रोजन उत्पादनासाठी जैव -मार्गाना प्रोत्साहन देण्यावर लक्ष केंद्रित केलेल्या प्रकल्पांसह, हरित हायड्रोजन उत्पादन आणि निर्यातीमध्ये भारत भविष्यात अग्रेसर राहून प्रथम स्थान मिळवेल,असा विश्वास त्यांनी व्यक्त केला. हरित हायड्रोजनकडे भविष्यातील इंधन म्हणून पाहिले जाते आणि भारत त्याच्या उत्पादनाचे जागतिक केंद्र बनण्यासाठी कटिबद्ध आहे असे मंत्रीमहोदयांनी यावेळी अधोरेखित केले.
जियो इंडिया 2024 मधे सुमारे 2,000 हितसंबंधीत सहभागी होण्याची अपेक्षा असून त्यात 20 हून अधिक बैठका, 4 पूर्ण चर्चासत्रे, 200 हून अधिक तंत्रज्ञान विषयक शोध पेपर्स आणि 50हून अधिक प्रदर्शन बूथ असतील अशी अपेक्षा आहे.