केंद्रीय गृहमंत्री आणि सहकार मंत्री अमित शहा यांनी आज भगवान बिरसा मुंडा यांच्या 150 व्या जयंती वर्षानिमित्त नवी दिल्लीतील बानसेरा उद्यानात त्यांच्या भव्य पुतळ्याचे अनावरण केले.
भगवान बिरसा मुंडा हे केवळ त्यांच्या मूळ आदिवासी संस्कृतीचे रक्षणकर्ते तर बनलेच त्याबरोबरच आपले जीवन कसे जगावे आणि जीवनातील ध्येय आणि उद्दिष्टे काय असावीत हे त्यांनी आपल्या 25 वर्षांच्या अल्पशा आयुष्यात आपल्या कर्तृत्वातून देशातील अनेकांना आपल्या कृतीद्वारे दर्शवले, असे केंद्रीय गृहमंत्री अमित शहा म्हणाले. भगवान बिरसा मुंडा हे खरोखरच स्वातंत्र्यलढ्यातील महान नायकांपैकी एक आहेत, असे त्यांनी सांगितले. 1875 साली जन्मलेल्या भगवान बिरसा मुंडा यांनी लहान वयातच आपल्या माध्यमिक शिक्षणादरम्यान धर्मांतराच्या विरोधात आवाज उठवला होता, यांचा उल्लेख अमित शहा यांनी केला. संपूर्ण भारतावर आणि जगाच्या दोन तृतीयांश भागावर जेव्हा इंग्रजांचे राज्य होते, त्या वेळी बिरसा मुंडा यांनी धर्मांतराच्या विरोधात खंबीरपणे उभे राहण्याचे धाडस दाखवले आणि पुढे याच दृढनिश्चयामुळे आणि शौर्यामुळेच ते देशाचे प्रमुख नेते बनले, असेही त्यांनी सांगितले. राष्ट्रीय नायक बिरसा मुंडाजी हे रांची येथील तुरुंगापासून ते इंग्लंडच्या राणीपर्यंत, देशवासीयांचा आवाज बनले होते, असे शहा म्हणाले.
भगवान बिरसा मुंडा यांनी जल, जंगल आणि जमीन हे आदिवासी परिसंस्थेचे, उपजीविकेचे आणि संस्कृतीचे अविभाज्य घटक आहेत आणि ते आदिवासींचे सर्वस्व आहेत या संकल्पनेचे पुनरुज्जीवन केले आहे, असे अमित शहा यांनी सांगितले. बिरसा मुंडा यांनी आदिवासी समाजात इतर विविध क्षेत्रात जागृती केली, याची शहा यांनी आठवण करून दिली. मद्यपान , जमीनदारांची शोषण करणारी व्यवस्था आणि ब्रिटिश राजवट या गोष्टींना भगवान बिरसा मुंडा यांनी विरोध केला. या देशातील आदिवासी समाजाच्या सामाजिक सुधारणेत, स्वातंत्र्यलढ्यात आणि धर्मांतरविरोधी चळवळीत भगवान बिरसा मुंडा यांनी दिलेल्या योगदानाबद्दल संपूर्ण देश सदैव ऋणी राहील, असे शहा म्हणाले.
वयाच्या अवघ्या 25 व्या वर्षी भगवान बिरसा मुंडा यांनी ब्रिटीश राजवटीच्या विरोधात क्रांतीची मशाल प्रज्वलित करून आदिवासींच्या स्थितीकडे देशाचेच नव्हे तर संपूर्ण जगाचे लक्ष वेधण्याची महत्वपूर्ण कामगिरी केली. त्यांच्या कार्यामुळे आज 150 वर्षांनंतरही संपूर्ण देश त्यांच्यापुढे नतमस्तक होत आहे, असेही गृहमंत्र्यांनी सांगितले.