केंद्रीय ग्रामविकास, कृषी व शेतकरी कल्याण मंत्री शिवराज सिंह चौहान यांच्या हस्ते ‘नयी चेतना– पहल बदलाव की’ या अभियानाच्या तिसऱ्या वर्षीच्या कार्यक्रमाची म्हणजेच लिंगाधारित हिंसेविरुद्ध सुरु केलेल्या राष्ट्रीय अभियानाची 25 नोव्हेंबर 2024 रोजी नवी दिल्ली येथील संसद मार्गावरील, आकाशवाणीच्या रंग भवन सभागृहात सुरुवात होणार आहे.
केंद्रीय महिला आणि बालविकास मंत्री अन्नपूर्णा देवी देखील या लिंगाधारित हिंसेचे उच्चाटन करण्यासाठी सरकारने सुरु केलेल्या सामुहिक प्रयत्नांच्या समारंभाला उपस्थित राहणार आहेत.
केंद्रीय ग्रामविकास मंत्रालयाच्या आधिपत्याखाली सुरु असलेल्या दीनदयाळ अंत्योदय योजना-राष्ट्रीय ग्रामीण उपजीविका अभियानातर्फे (डीएवाय-एनआरएलएम) संचालित हे एक महिना कालावधीचे अभियान देशभरातील सर्व राज्ये तसेच केंद्रशासित प्रदेशांमध्ये 23 डिसेंबर 2024 पर्यंत राबवण्यात येईल. डीएवाय-एनआरएलएम च्या व्यापक स्वयंसहाय्य बचत गटांच्या (एसएचजी) नेटवर्कच्या नेतृत्वात चालणारे हे अभियान लोकचळवळीच्या उर्जेला मूर्त रूप देईल.
हे अभियान म्हणजे “संपूर्णतः प्रशासन” या तत्वासः केलेला सामुहिक प्रयत्न असून महिला आणि बालविकास, आरोग्य आणि कुटुंब कल्याण, शालेय शिक्षण आणि साक्षरता, गृह व्यवहार, पंचायती राज, सामाजिक न्याय आणि सक्षमीकरण, युवा व्यवहार आणि क्रीडा, माहिती आणि प्रसारण तसेच न्याय विभाग ही 9 केंद्रीय मंत्रालये/विभाग या अभियानात सहभागी होणार आहेत.
मूलभूत पातळीवरील उपक्रमांच्या माध्यमातून लिंगाधारित हिंसेविरुद्ध जागरूकता वाढवणे तसेच माहितीआधारित कृतीला चालना देणे हे नयी चेतना अभियानाचे उद्दिष्ट आहे. या अभियानाने सुरुवातीपासून लिंग समानता तसेच महिला सक्षमीकरणयासाठी महत्त्वाच्या चळवळीची जोपासना करत देशभरात लाखो लोकांना याबाबतीत सजग केले आहे. या अभिनानाने संपूर्ण देशभर लिंगाधारित हिंसेच्या संदर्भात जागरुकता निर्माण करणारे 9 लाखांहून अधिक उपक्रम राबवत देशातील 31 राज्ये तसेच केंद्रशासित प्रदेशांमध्ये पहिल्या वर्षी साडेतीन कोटी लोकांपर्यंत पोहोचण्यात आणि दुसऱ्या वर्षी साडेपाच कोटी लोकांपर्यंत पोहोचण्यात यश मिळवले.
सर्व प्रकारच्या लिंगाधारित हिंसेविरुद्ध जनजागृती करून, समुदायांना अशा घटनांविरुद्ध आवाज उठवण्यासाठी तसेच कारवाईची मागणी करण्यासाठी प्रोत्साहित करणे, वेळेवर मदत पोहोचवण्यासाठी समर्थन प्रणालींना सुलभता प्रदान करणे आणि अशा हिंसाचाराविरुद्ध निर्णायकपणे कृती करण्यासाठी स्थानिक संस्थांना सक्षम करणे ही नयी चेतना 3.0 ची उद्दिष्ट्ये आहेत. “एक साथ, एक आवाज, हिंसा के खिलाफ” हे यावर्षीच्या अभियानाचे घोषवाक्य संपूर्णतः सामाजिक आणि संपूर्णतः सरकारी दृष्टीकोन स्वीकारून, एककेंद्रीकरणाच्या प्रयत्नांद्वारे सामुहिक कृतीच्या आवाहनाला मूर्त रूप देते.