कोल्हापूर जिल्हा ग्रामीण डाक सेवक संमेलन 13 डिसेंबरला होणार असून केंद्रीय दळणवळण मंत्री ज्योतिरादित्य एम. सिंधिया या संमेलनाचे अध्यक्षस्थान भूषविणार आहेत.
सायंकाळी 4.00 वाजता सुरू होणा-या या संमेलनाचा उद्देश ग्रामीण भागातील भारतीय टपाल सेवेचा कणा मानल्या जाणाऱ्या ग्रामीण डाक सेवकांच्या समर्पित सेवेला सलाम करणे आणि ग्रामीण भारतामध्ये दूर-दुर्गम भागात टपाल, बँकिंग आणि विमा सेवांचा विस्तार करण्यातील त्यांच्या महत्त्वपूर्ण भूमिकेची दखल घेणे हा आहे.
केंद्रीय मंत्री ज्योतिरदित्य सिंधिया यांच्यासोबत व्यासपीठावर महासंचालक (डाक सेवा) जितेंद्र गुप्ता आणि, महाराष्ट्र सर्कलचे मुख्य पोस्टमास्टर जनरल अमिताभ सिंह उपस्थित राहणार आहेत. तसेच पोस्टल सर्व्हिसेस बोर्ड सदस्य (कार्मिक) सुवेंदू कुमार स्वैन, पुणे विभागाचे पोस्टल सर्व्हिसेसचे संचालक अभिजीत बनसोडे, आणि गोवा विभागाचे पोस्टल सर्व्हिसेसचे संचालक रमेश पाटील, हेही या कार्यक्रमाला उपस्थित असतील.
या कार्यक्रमास गोवा आणि पुणे क्षेत्रातील अंदाजे 5,500 ते 6,000 ग्रामीण डाक सेवक उपस्थित राहतील, अशी अपेक्षा आहे. कार्यक्रमादरम्यान केंद्रीय मंत्री ग्रामीण डाक सेवकांशी संवाद साधून ग्रामीण टपाल सेवेचे आधुनिकीकरण आणि नागरिक-केंद्रित टपाल ‘नेटवर्क’ उभारण्याबाबत आपला दृष्टिकोन मांडतील आणि ग्रामीण भागात सरकारी आणि आर्थिक सेवा पोहोचविण्यात ग्रामीण डाक सेवकांची भूमिका अधिक बळकट करण्यासाठी त्यांना प्रेरित करतील.
संमेलनाच्या निमित्ताने मंत्री सिंधिया यांच्या हस्ते काही कर्मचा-यांचा सत्कार करण्यात येणार आहे. यामध्ये नवीन खाती उघडणे, टपाल जीवन विमा (पीएलआय) आणि ग्रामीण टपाल जीवन विमा (आरपीएलआय) योजनेचा अधिकाधिक लोकांना लाभ देणे, प्रिमियम संकलन, थेट लाभ हस्तांतरण (डीबीटी) व्यवहार, तसेच नोंदणीकृत टपालाचे वेळेवर वितरण अशा विविध क्षेत्रांत उत्कृष्ट कामगिरी करणाऱ्या ग्रामीण डाक सेवकांचा समावेश आहे.
हे संमेलन, ग्रामीण भारतातील लोकाभिमुख सेवा वितरणासाठी भारतीय टपाल विभागाला अधिक सक्षम करण्याची सरकारची दृढ वचनबद्धता अधोरेखित करते. देशातील प्रत्येक टपाल कार्यालय नागरिकाभिमुख सेवांचे प्रमुख केंद्र बनविण्याच्या दिशेने हे महत्त्वाचे पाऊल आहे.
Matribhumi Samachar Marathi

